Monday, January 20, 2025

/

येथेच वास्तव्य करून साधेण बेळगावचा सर्वांगीण विकास -जगदीश शेट्टर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :माझ्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला काही अर्थ नाही ही निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी तसेच राष्ट्रीयता आणि बेळगाव, कर्नाटकसह देशाचा विकास यासाठी महत्त्वाची आहे. लोकसभा सदस्य होऊन बेळगाव मतदार संघ माझी कर्मभूमी मानून या ठिकाणीच घर बांधून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर कार्य करण्यास मी कटिबद्ध आहे, असे बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये आयोजित आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उमेदवार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मला भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी येथील सर्व स्थानिक भाजप नेते आजी-माजी आमदार जिल्हाध्यक्ष भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह समस्त जनतेने माझे स्वागत करून माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

माझ्या स्वतःच्या आणि भाजप वरिष्ठ नेत्यांच्या इच्छेनुसार मी बेळगाव मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. बेळगाव हे माझ्यासाठी कांही नवीन नाही. गेल्या तीन दशकांपासून बेळगावशी माझा संबंध आहे. यापूर्वी मी दोन वेळा विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी सुरेश अंगडी इराण्णा कडाडी जगदीश मल्लिकार्जुन टुबाकी हे जिल्हाध्यक्ष होते. तेंव्हा विरोधी पक्ष नेता या नात्याने विविध कामांसाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्याकरिता बऱ्याचदा बेळगाव दौऱ्यावर येऊन येथील अनेक प्रमुख गावांना मी भेटी दिल्या आहेत. पक्ष बळकट करून त्याचा विस्तार वाढवण्याचे काम त्यावेळी मी केले आहे. एवढेच नाही तर बेळगाव जिल्हा पालकमंत्री म्हणून देखील मी दोन वेळा काम पाहिले आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामे राबवण्याबरोबरच वेळोवेळी प्रवास दौरा करून जनतेच्या समस्या जाणून घेण्याचा आणि त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात दर आठवड्याला मी बेळगावला भेट देत होतो. तेंव्हा आसपासच्या राज्यांच्या सहकार्याने योग्य उपाय योजना राबवून मी येथील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाखाली आणला होता. एकंदर या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.

बी. एस. येडीयुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी मुख्यमंत्री असताना मी सभापती होतो. त्यावेळी बेळगावातील सुवर्ण विधानसौध बांधण्यासाठी योग्य जागा निवडण्या करिता सभापतींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. माझ्या अध्यक्षतेखाली समितीने अहवाल दिल्यानंतर आम्ही निवड केलेल्या जागी सुवर्ण विधानसौध बांधण्यास तत्कालीन सरकारने परवानगी दिली होती. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ तेंव्हा येडीयुरप्पा मुख्यमंत्री आणि मी सभापती असताना झाला होता. योगायोग पहा की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना बेळगाव सुवर्ण विधानसौध इमारतीचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना बेळगावला निमंत्रित करून सुवर्णसौद्धचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले होते. या पद्धतीने बेळगावशी माझे मोठे दृढ संबंध आहेत. त्यामुळेच काल आगमन झाल्यानंतर बेळगावात माझे भव्य स्वागत करण्यात आले, असे शेट्टर यांनी पुढे सांगितले.Shetter

खासदार मंगला अंगडी, राज्यसभेचे सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, संजय पाटील, भाजप नेते एम. बी. जिरली, शंकरगौडा पाटील, बैलहोंगलचे माजी आमदार विश्वनाथ पाटील, जगदीश मेटगुड, विजय मेटगुड, वीरूपाक्ष मामिनी, सौंदत्तीच्या भाजप उमेदवार रत्ना मामणी, माजी आमदार महादेवप्पा यादव, डॉ. रवी पाटील, गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, जिल्हाध्यक्ष सुभाषगौडा पाटील आदीसह सर्व पदाधिकारी आणि समस्त कार्यकर्त्यांच्या सहकार्य आणि नेतृत्वाखाली संघटितपणे आम्ही प्रचाराचे कार्य सुरू केले आहे.

ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी देशातील 140 कोटी जनतेची इच्छा आहे. त्यासाठी भाजपला विजयी करणे आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की माझी जन्मभूमी हुबळी असली तरी कर्मभूमी बेळगाव आहे. आता लोकसभेचा उमेदवार या नात्याने मी या ठिकाणीच घर बांधून वास्तव्य करणार आहे. तसेच लोकसभा सदस्य या नात्याने या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आहे असे सांगून शेट्टर यांनी दिवंगत खासदार व रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन त्यांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे असे सांगितले. माझ्यावर केल्या जाणाऱ्या टीकेला काही अर्थ नाही ही निवडणुक राष्ट्रीयता तसेच बेळगाव, कर्नाटकसह देशाचा विकास यासाठी महत्त्वाची आहे. लोकसभा सदस्य होऊन बेळगाव मतदार संघ माझी कर्मभूमी मानून या ठिकाणीच घर बांधून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर कार्य करण्यास मी कटिबद्ध आहे, असे भाजप उमेदवार माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेस खासदार मंगला अंगडी, राज्यसभेचे सदस्य इराण्णा कडाडी, माजी आमदार ॲड. अनिल बेनके, संजय पाटील, भाजप नेते एम. बी. जिरली, शंकरगौडा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाषगौडा आदी नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.