बेळगाव लाईव्ह : हिडकल जलाशयाच्या बॅकवॉटर मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांसंदर्भात आजतागायत चारवेळा हायकोर्टाने शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आदेश देऊनही पाटबंधारे खाते ती देण्यास टाळाटाळ करत आहे.
याविरोधात बेळगावात हिडकल धरणाच्या बॅक वॉटरमुळे जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेकडो शेतकऱ्यांनी बेळगावमधील चन्नम्मा सर्कलजवळ बैलगाडी घेऊन भव्य आंदोलन छेडत पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी गावातील शेतकऱ्यांनी हिडकल धरण आणि कर्नाटक पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात अनेकदा संघर्ष करूनही पाटबंधारे विभागाने नुकसान भरपाई दिली नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.
दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने ३९६ एकर जमिनीची भरपाई देण्याचे आदेश दिले असूनही अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे येथील आज शेतकऱ्यांनी बैलगाड्या घेऊन बेळगावात येऊन पाटबंधारे विभागाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
सदर शेतकऱ्यांना मंत्र्यांनीही २८ फेब्रुवारी रोजी प्रभारी वरिष्ठांची परवानगी घेऊन प्रस्ताव सादर करू असे सांगितले होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारले असून ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय ते मागे घेणार नाही,
आमच्या कुटुंबाला त्रास झाल्यास एम. डी. राजेश, बी. आर. राठोड हे मुख्य अधिकारीच जबाबदार असतील, बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनात हिडकल धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.