बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतून अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी ग्लोब सर्कल आणि गांधी सर्कल क्लब रोड येथे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत.
कॅन्टोन्मेंट हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते हद्दीत शाळा व महाविद्यालय आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अलीकडे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
ग्लोब सर्कल आणि गांधी सर्कल क्लब रोड येथे तैनात सशस्त्र जवान सध्या अवजड वाहनांना अन्य मार्गाने जाण्याच्या सूचना करत आहेत. लवकरच अशा अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ग्लोब थिएटर येथे मंगेश होंडा शेजारील रस्त्याने शौर्य चौक मार्गे गणेशपूर व बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर जाता येते. यामुळे अनेक अवजड वाहन चालक या रस्त्याचा वापर करत होते. उभ्या मारुती जवळून कॅन्टोन्मेंट सीईओंच्या बंगल्याकडून शौर्य चौकाकडे जाता येते.
मात्र वाहतूक पोलीस स्थानकाजवळच वाहने अडवली जात असून युनियन जिमखाना मार्गे जाण्याच्या सूचना वाहनचालकांना केल्या जात आहेत.
संबंधित रस्त्यांवर अनेक शाळा आहेत. यापूर्वी अवजड वाहनांमुळे अनेकांचा जीव गेला आहे. याचा विचार करून सदर रस्ते अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.