बेळगाव लाईव्ह : बेळगाव मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांनी निवडणूक लढवू नये, या मुद्द्यावरून भाजपनेच सुरू केलेल्या ‘गो बॅक’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील असंतुष्ट नेत्यांना शांत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आज रात्री बेळगावात येत असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजप हायकमांडने बेळगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली. जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजीसत्र सुरु झाले. यादरम्यान अनेक ठिकाणी ‘शेट्टर गो बॅक’ चे बॅनर झळकले. यावरून शेट्टर यांच्या उमेदवारीवरून बेळगाव भाजपमध्ये अंतर्गत राजकारण सुरु असल्याची माहिती पुढे आली.
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये फुटीर नेत्यांची भर पडू नये कदाचित याचसाठी अचानकपणे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा बेळगाव दौरा ठरल्याचे समजते. शिवाय येडियुरप्पा हे बेळगावातील भाजपचे आमदार, माजी आमदार आणि स्थानिक भाजप नेत्यांची बेळगावातील पंचतारांकित हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक घेणार असल्याचे कळते.
गो बॅक शेटर असा सोशल मीडियावर प्रचार करून आपला रोष व्यक्त करणाऱ्या बेळगावातील स्थानिक नेते आणि भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी येडियुरप्पा आज बेळगावात येत असून आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत ते हॉटेल UK 27 मध्ये वास्तव्य करणार आहेत.
त्याच ठिकाणी सर्व नेतेमंडळींची बैठक होणार असल्याची माहिती आहे. शिवाय उद्याच बेळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार जगदीश शेट्टर हे प्रचाराला सुरुवात करणार असून बी. एस. येडियुरप्पा हे आपल्यासमवेत जगदीश शेट्टर यांनाही घेऊन दाखल होतात, याची उत्सुकता लागली आहे.