बेळगाव लाईव्ह:राज्याच्या पुढाकाराला अनुसरून केंद्र सरकारने सौंदत्ती येथील श्री रेणुका येल्लम्मा मंदिराच्या आवारातील पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी 11 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरुवारी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी आणि स्थानिक आमदार विश्वास वैद्य यांच्या समवेत विविध विकास कामांचे आभासी उद्घाटन केले. तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक वारसा संवर्धन (प्रसाद) योजनेचा एक भाग म्हणून मंदिराला या निधीचे वाटप करण्यात आले.
केंद्र सरकारकडून आर्थिक मदत मिळणाऱ्या कर्नाटकातील चार मंदिरांपैकी सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिर हे एक आहे. इतर तीन मंदिरांमध्ये म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिर, उडुपी जिल्ह्यातील कुंजरागिरी येथील श्री मध्वावाना आणि बिदर जिल्ह्यातील पापनाश मंदिर यांचा समावेश आहे.
पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री रेणुका यल्लम्मा मंदिर येथील पायाभूत सुविधांच्या सुधारणांमध्ये आवार भिंत, प्रतीक्षालय (वेटिंग लाउंज), तीर्थक्षेत्र माहिती केंद्र, मनुष्य आणि गुरेढोरे यांच्यासाठी प्रथमोपचार सुविधा, कॅन्टीन, सीसीटीव्ही कॅमेरे, लॉकर्सची उभारणी यासह इतर सुविधांमध्ये कचऱ्याचा डबा (डस्टबिन), बाकडी (बेंच) आणि पादत्राणे ठेवण्याची जागा (शू स्टँड) यांचा समावेश असणार आहे. केंद्राच्या निधीचा वापर प्रामुख्याने मंदिर परिसरात मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जाईल.
बेळगाव सुवर्ण विधान सौध (एसव्हीएस) येथे डिसेंबरमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाप्रसंगी राज्य सरकारने श्री रेणुका यल्लम्मा क्षेत्र पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आहे. ज्याचे उद्दिष्ट मंदिराला आंतरराष्ट्रीय पर्यटन मानकांपर्यंत पोहोचवण्याचे आहे.
याखेरीज मुझराई मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी मंदिर व्यवस्थापन समितीला मंदिराची कमाई 50 टक्के विकास कामांसाठी आणि उर्वरित 50 टक्के देखभालीसाठी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. दरवर्षी देणग्यांच्या माध्यमातून सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा मंदिराची अंदाजे रुपये 20 कोटी कमाई होत असते.