Sunday, November 24, 2024

/

अतिक्रमण विरोधात गाडेमार्ग भागातील शेतकऱ्यांची आंदोलनाची तयारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी परंपरागत ठेवलेल्या रस्ते वजा पायवाटांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले नाही तर येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरात शेतजमिनी असलेल्या शेतकऱ्यांच्या काल शुक्रवारी वडगाव येथील मंदिरात झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी रमाकांत बाळेकुंद्री हे होते. येळ्ळूर रोड गाडेमार्ग येथील शेतकऱ्यांना शेतीमध्ये ये-जा करण्यासाठी परंपरागत रस्ते ठेवले आहेत. मात्र गेल्या कांही महिन्यांपासून या भागामध्ये शेत जमिनीची विक्री करून त्या ठिकाणी इमारती बांधल्या जात आहेत.

एका आर्थिक संस्थेने या भागात  भूखंड (प्लॉट) पाडून जमिनीची विक्री चालवली आहे. मात्र प्लॉट पडताना शेतकऱ्यांसाठी असलेला परंपरागत रस्ता वजा पायवाटेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला ये-जा करण्यासाठी असणारा मार्ग बंद झाला आहे. संबंधित संस्थेला व जमीन खरेदी करणाऱ्या नागरिकांना शेतकऱ्यांकडून अनेक वेळा सूचना करूनही शेतीला उपयोगी ठरणारे रस्ते बंद केले जात आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यवसायावर गंडांतर येण्याची शक्यता आहे. रस्ता नसल्याने शेती करणे कठीण झाले आहे. सदर अतिक्रमण हटवून समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या 1 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन सादर केले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.Farmers meeting

येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरात शेत जमिनी असलेल्या शेतकऱ्यांच्या कालच्या बैठकीत रस्ते पायवाटांवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेण्यात येऊन कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीत प्रत्येकाने आपले विचार मांडले. तात्काळ कारवाई होऊन अतिक्रमन न हटवल्यास येत्या काळात उग्र आंदोलन छेडण्याची तयारी करण्याचेही बैठकीत ठरले. ज्या आर्थिक संस्थेने येळ्ळूर रोड गाडेमार्ग परिसरात भूखंड पाडून अतिक्रमण केले आहे. त्या संस्थेकडे विनंती तक्रार करून देखील संबंधित संस्थेने त्याची दखल घेतलेली नाही.

तेंव्हा आता लवकरात लवकर त्यांनी आपले अतिक्रमण हटवावे अन्यथा सदर त्या संस्थेच्या कार्यालयासमोर मोठे आंदोलन  करू असा इशारा  बैठकीत देण्यात आला. बैठकीस मनोहर हलगेकर यांच्यासह राजू सावंत,विजय सावंत, केशव पोळ,परशुराम गडकरी,मंगेश गडकरी गडकरी.मंगेश भिसे, बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.