Wednesday, December 4, 2024

/

संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बंद पाडले बायपासचे काम

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम संतप्त शेतकऱ्यांनी आज पुन्हा एकदा बंद पाडण्याबरोबरच दाखल झालेली यंत्रसामग्री शेत जमिनीतून हटविण्यास भाग पाडले. तसेच पुन्हा जर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर आगामी निवडणुकीत धडा शिकू, असा संतप्त इशाराही दिला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाचा बायपास तयार करण्याचा प्रयत्न मोठ्या संख्येने जमलेल्या शेतकऱ्यांनी आज बुधवारी सकाळी पुन्हा एकदा हाणून पाडण्याबरोबरच जेसीबी वगैरे यंत्रे हटवून ती सर्व्हिस रोडवर नेऊन लावण्यास भाग पाडले. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तथापि शेतकरी नेते प्रकाश नायक, राजू मरवे आदींनी न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना आणि सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी होरपळून निघत असताना तसेच परवानगीची कोणतीही कागदपत्रे नसताना आमच्या शेतजमिनींमध्ये घुसून रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या या प्रकाराद्वारे जाणून बुजून अशांतता निर्माण केली जात आहे.

या पद्धतीने जबरदस्तीने रस्त्याचे काम सुरू शेत जमिनीची हानी करणे म्हणजे शेतकऱ्यांना हानी पोहोचवणे असा होतो. तेंव्हा तात्काळ आम्हा शेतकऱ्यांना सुरक्षा पुरवली जावी. तसेच आज यंत्रसामग्री घेऊन शेतात घुसलेल्यांवर सुमोटो गुन्हा दाखल करून चौकशी केली जावी, अशी मागणी यावेळी प्रकाश नायक यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. याप्रसंगी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे सुरू केले जाऊ नये असे सन्माननीय न्यायालयाने स्वच्छ स्पष्ट निर्देश दिले असताना जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. न्यायालयाचा आदेशाच्या अवमान करत, सध्या निवडणूक जवळ येत असताना हे गैर कृत्य केले जात आहे. यावरून संबंधित लोकांची माणुसकी हरवली आहे हे स्पष्ट होते. सर्व अंदाधुंदी कारभार सुरू असून ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे सर्व कांही चालले आहे. मात्र हे असेच चालू राहिल्यास राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून प्रशासनाची भ्रष्ट व्यवस्था आम्ही उघड्यावर आणू. तसेच येत्या निवडणुकीत चांगला धडा शिकवू, असे प्रकाश नायक यांनी घटनास्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.Farmrs

शेतकरी नेते राजू मरवे यांनी देखील घडल्या प्रकाराबद्दल निषेध नोंदविला ते म्हणाले की, 2021 पासून हालगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावेळी जिल्हा न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश दिला होता. मात्र तो स्थगिती आदेश मोडून 32 ते 38 दिवस रस्त्याचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली. तेंव्हा उच्च न्यायालयाने देखील रस्त्याचे काम जागच्याजागी बंद करण्याचा आदेश दिला आहे. तेंव्हापासून या रस्त्याचे काम बंद असताना अलीकडे उच्च न्यायालयाने या रस्त्याचा खटलाच रद्दबातल केला आहे. या पद्धतीने शेतकऱ्यांचा एक प्रकारे विजय झाला आहे. आता उच्च न्यायालयाचा तो आदेश देखील पायदळी तुडवून हे प्रशासन पुन्हा बायपास रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.

आज सकाळी या ठिकाणी यंत्रसामग्री आणण्यात आली होती. मात्र आम्ही त्यांना आमच्या शेत जमिनीतून हुसकावून लावले आहे. एकंदर न्यायालयाचा आदेश धुडकावून रस्त्याचे काम सुरू करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे असे सांगून निवडणूक तोंडावर येत आहे. तेंव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा. जर तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना त्रास देत असाल तर शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शेतकरी नेते मरवे यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.