बेळगाव लाईव्ह:परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती तयारी करावी. परीक्षेदरम्यान अनियमितता, अनावश्यक गोंधळ व गैरसोय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी नीटनेटकी यंत्रणा निर्माण करून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे शहरातील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे आज सोमवारी आयोजित एसएसएलसी वार्षिक परीक्षा तयारीसंदर्भातील बैठकीचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
येत्या 25 मार्च ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत होणाऱ्या एसएसएलसी वार्षिक परीक्षेदरम्यान कोणत्याही बेकायदेशीर क्रियाकलापांना परवानगी न देता निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेतली जावी. परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा मोबाईल फोन कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्यास मनाई आहे. संबंधित परीक्षा केंद्राच्या प्रमुखांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी पुढे म्हणाले.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचता यावे यासाठी आवश्यक बस सेवा उपलब्ध करावी. परीक्षा काळात परीक्षा केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. परीक्षार्थी आणि परीक्षेसाठी नियुक्त शिक्षक अधिकाऱ्यांनी कर्मचारी वगळता इतर कोणालाही केंद्रात प्रवेश दिला जाऊ नये.
परीक्षा केंद्रा सभोवती 200 मीटर परिसरात संचारबंदी लागू असणार आहे असे सांगून परिक्षा आयोजनाबद्दल शासनाकडून सर्व अधिकाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सूचना दिल्या जातील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.