बेळगाव लाईव्ह:अचानक दाखल झालेल्या एका जंगली टस्कर हत्तीने लहान कंग्राळीसह शहरातील शाहूनगर, वैभवनगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. गेल्या मे 2023 नंतर महाराष्ट्रातील जंगलातून दुसऱ्यांदा कर्नाटक हद्दीत आलेल्या या टस्कर हत्तीने कोणाला इजा केली नसली तरी वाहनांचे मात्र नुकसान केले. अखेर वनविभागाने आज दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास त्या हत्तीला पूर्ववत जंगलात पिटाळले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबतची माहिती अशी की, एका टस्कर हत्तीने सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास लहान कंग्राळीमध्ये प्रवेश केला. तेथून तो बॉक्साइट रोड मार्गे शाहूनगर आणि वैभवनगरच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी बराच काळ घुटमळणाऱ्या या हत्तीने तेथील रस्त्यावर पार्क केलेल्या कांही दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले. एका कार गाडीची काच फोडण्याबरोबरच दोन-तीन दुचाकी त्याने सोंडेने भिरकावून टाकल्या. शाहूनगर येथे एका दुचाकीची सीट आपल्या सुळ्यांनी उचकटून फेकून दिली.
या पद्धतीने हत्तीचे आगमन झालेले पाहून घाबरगुंडी उडालेल्या नागरिकांनी स्वतःला घरात कोंडून घेणे पसंद केले. त्यामुळे परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. कांही उत्साही लोकांनी घरांच्या छतावरून मोबाईलवर हत्तीच्या कारणाम्याचे चित्रीकरणही केले. शाहूनगर व वैभवनगर येथून तो टस्कर शांतपणे शेतातून रमतगमत मोठ्या कंग्राळीच्या दिशेने गेला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
जंगली टस्कर हत्तीच्या आगमनाची माहिती मिळताच सतर्क झालेल्या बेळगाव वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ विशेष मदत पथकांची निर्मिती करून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्या हत्तीला शाहूनगर, वैभवनगर येथून सुरक्षितपणे हुसकावत मोठ्या कंग्राळी मार्गे पुन्हा लहान कंग्राळीकडे आणले. यावेळी हत्तीच्या मागे आणि पुढे अशी वन खात्याची पथके कार्यरत होती. हत्ती समोर सुरक्षित अंतर ठेवून मोटरसायकल वरून जाणारे वनाधिकारी लोकांना सावधगिरीचा इशारा देताना दिसत होते. त्यांनी हत्तीच्या मार्गावरील सर्व वाहन चालक व नागरिकांना सुरक्षित माघारी पिटाळले. वनखात्याच्या पथकाने लहान कंग्राळी येथून त्या हत्तीला मोठ्या कौशल्याने अगसगे, बेक्कीनकेरी मार्गे दुपारी सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास जवळच्या महाराष्ट्र हद्दीतील जंगलात हुसकावून लावले. यासाठी बेळगाव वन विभागाचे अधिकारी महाराष्ट्राच्या वनाधिकाऱ्यांची संधान साधून होते. हत्तीला जंगलात हुसकावून लावल्यानंतर तो पुन्हा माघारी फिरू नये यासाठी वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी बराच काळ जंगलाच्या सीमेवर तळ ठोकून होते.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगावच्या नागरी वसाहतीत शिरलेला हा टस्कर हत्ती बहुदा आजरा येथील जंगलातून आला असावा असा कयास आहे. तसेच त्या टस्कर हत्तीचे नांव ‘तळोबा गणेश’ असे असून गेले 10 महिने तो जंगलातील आपला कळप सोडून बाहेरच फिरत आहे. हत्तींच्या एका कळपात दोन नर टस्कर सुखाने नांदू शकत नाहीत. त्यांच्यापैकी जो बलवान असेल तो दुसऱ्याला कळपातून हुसकावून लावतो. तशीच परिस्थिती तळोबा गणेश या टस्करावर ओढवली असावी. कळपातून गेल्या 10-12 महिन्यापूर्वी तडीपार झालेला हा टस्कर फिरत फिरत प्रथम गडहिंग्लजला पोहोचला होता.
तेथून मे 2023 मध्ये तो हत्तरगी टोल नाक्याच्या ठिकाणी दाखल झाला. तेथे आसपासच्या शेत पिकांचे बरेच नुकसान केल्यानंतर तो पुन्हा माघारी गडहिंग्लजकडे गेला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा आज पुन्हा कर्नाटकात बेळगाव येथे त्याचे दर्शन घडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे वनखाते सदर टस्कर हत्तीला ट्रॅन्क्युलाईज करून अर्थात बेशुद्ध करून पुन्हा आजरा येथील जंगलात सोडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
एकंदर बेळगाव शहराच्या नागरी वसाहतीत शिरलेल्या जंगली टस्कर हत्तीला सुरक्षितपणे पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडण्यासाठी बेळगाव वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आज शुक्रवारी सकाळपासून जवळपास 7 तास परिश्रम घ्यावे लागले.