बेळगाव लाईव्ह :हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेतलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी करत बायपास शेजारील शेतातील बोअरवेलचे वीज कनेक्शन बेकायदेशीररित्या तोडून एका शेतकऱ्याला निष्कारण त्रास दिल्याचा संतापजनक प्रकार आज गुरुवारी सकाळी उघडकीस आला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून एकीकडे हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा हाती घेऊन शेतकऱ्यांना त्रास देणे सुरूच आहे. शेतकरी देखील जिंकू किंवा मरू या इर्षेने बायपासला विरोध करत आहेत. हे सर्व सुरू असताना आता दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी आणखी वाढली असून बायपास शेजारी शेती असलेल्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊन त्यांचे नुकसान केले जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बायपास शेजारी शेती असलेल्या अनगोळच्या गोपाळ सोमनाचे यांना आज गुरुवारी सकाळी आपल्या शेतातील बोअरवेलचे वीज कनेक्शन वायरी तोडून खंडित करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
खरतर हलगा -मच्छे बायपास शेजारी सोमनाचे यांचे शेत आहे, मात्र तरीही कोणतेही कारण नसताना बेकायदेशीररित्या त्यांच्या शेतात घुसून बोअरवेलसाठी असलेल्या वीज कनेक्शनच्या वायरी तोडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
त्यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात पिकांना पाणी कसे द्यायचे? असा मोठा प्रश्न सोमनाचे यांना पडला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन आपल्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना शेतकरी गोपाळ सोमनाचे म्हणाले की, माझ्या शेतातील बोअरवेलवर बसविलेल्या पंपाच्या वीजपुरवठ्याची वायरचे नुकसान करताना ती तोडून टाकण्याबरोबरच थोडीफार स्वतःबरोबर घेऊनही गेले आहेत. असे झाले तर आम्ही पीक कसे काढायचे? सध्या गाजर, मेथी, टोमॅटो, वांगी अशी पीक घेतली आहेत. त्यांना पाणी लागते ते पाणी आता कसे द्यायचे? आम्हा शेतकऱ्यांना का म्हणून हा त्रास दिला जात आहे? आम्ही काय गुन्हा केला आहे? असे झाले तर आम्ही जगायचे कसे?
सध्या पिण्यासाठी ही पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीत पिकांसाठी कुपनलिकेचा आधार असताना अशाप्रकारे वीज कनेक्शन सोडून ती देखील बंद करण्यात आली आहे. सदर बोअरवेल मी स्वतः खोदली आहे. या बोअरवेलच्या जोरावर आसपासच्या 8-10 एकर जमिनीत पीक घेतले जाते.
त्यामुळे ज्यांनी कोणी माझ्या बोअरवेलच्या वीज पुरवठ्याच्या वायरी तोडल्या आहेत त्यांच्यावर कारवाई करून मला तात्काळ नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी सोमनाचे यांनी केली.