बेळगाव लाईव्ह : एकसंबा म्हटलं की आठवतं ती सुप्रसिध्द बैलगाडी शर्यत. त्याच मैदानावर आ. प्रकाश हुक्केरी यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सावकार बैलगाडी शर्यतीत संदीप पाटील-कोल्हापूर यांच्या हरण्या बैलजोडीने केवळ २४ मिनिटे १७ सेकंदात ९.५ कि. मी. अंतर पार करत जनरल गटाच्या १७ लाख रुपयांच्या बक्षिसावर आपले नांव कोरले. लाखो शर्यत शौकिनांच्या उपस्थितीत शर्यती पार पडल्या.
विधान परिषद सदस्य, माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त आ. गणेश हुक्केरी आणि एकसंबा सावकार शर्यत कमिटी यांच्या नेतृत्वाखाली मलिकवाड माळावर आयोजित एकसंबा सावकार शर्यत मैदानात सकाळपासूनच शौकीन दाखल होत होते. दुपारी ४ वाजता आ. प्रकाश हुक्केरी शर्यत मैदानावर दाखल होताच लाखो शर्यत शौकिनांमधून प्रकाश हुक्केरी यांच्या नावाचा जयघोष पहायला मिळाला.
आ. प्रकाश हुक्केरी आणि आ. गणेश हुक्केरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘करटक गमनक’ या कन्नड चित्रपटाच्या टीझरचे अनावरण करण्यात आले.
दुपारी ४.२१ मिनिटांनी क-गटाच्या बैलगाडी शर्यतींना प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये शिवानंद पुजारी-अलखनूर, भीमराव पाटील-कोल्हापूर, आसिफ मुल्लानी-शिरढोण, शिवानंद कारे-अटलटी यांनी अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पटकावले. विजेत्यांना अनुक्रमे ७ लाख, ३ लाख, २ लाख आणि १ लाख रुपयांचे रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ब-गटाच्या बैलगाडीच्या शर्यतींना ५ वाजता सुरुवात करण्यात आली. ५.२८ मिनिटात ९.५ कि. मी. अंतर कापत बंडा खिलारे-दानोळी यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. राजेंद्र पाटील-तासगाव द्वितीय, महादेव गजबर-मलिकवाड तृतीय, अभिजीत देसाई-यरगट्टी यांच्या गाड्यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. या गटातील विजेत्यांना अनुक्रमे ९ लाख, ५ लाख, ३ लाख, १ लाख रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
अ-गटाच्या शर्यती ५.५९ वाजता सुरुवात करण्यात आली. यामध्ये केवळ 24 मिनिटं 17 सेकंदात अंतर पार करून संदीप पाटील-कोल्हापूर यांच्या हरण्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला. बंडा शिंदे-दानोळी द्वितीय, बाळासाहेब हजारे-शिरूर तृतीय, सागर सूर्यवंशी यांच्या गाडीने चतुर्थ क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे 17 लाख, ९ लाख, ५ लाख आणि २ लाखांचे रोख बक्षीस आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
व्यासपीठावर माजी आ. काकासाहेब पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, पंकज पाटील, बाळासाहेब पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, अण्णासाहेब हवले, सुदर्शन खोत, सुनील सप्तसागरे, रत्नाप्पा बाकळे, प्रदीप जाधव, राजेंद्र वड्डर, बाबणा खोत, संभाजी पाटील, अरुण बोने, सचिन बिंदगे, मल्लू हवालदार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा कार्यक्रम: हुक्केरी
हा सर्व सामान्य शेतकऱ्यांचा कार्यक्रम : हुक्केरी
शर्यत मैदानावर आ. प्रकाश हुक्केरी दाखल होताच कार्यकर्त्यांकडून एक क्विंटल वजनाच्या सफरचंदाचा हार घालण्याची तयारी सुरू होती. पण त्याला नकार देत हा कार्यक्रम केवळ हुक्केरी पिता-पुत्रांचा नसून माझ्या वाढदिवसाचे निमित्त आणि माझ्यावरील प्रेमातून कार्यकर्त्यांनी भरवलेला कार्यक्रम आहे. तो या भागातील शेतकऱ्यांना समर्पित करतो, असे उद्गार आ. प्रकाश हुक्केरी यांनी काढताच उपस्थितांतून टाळ्यांचा गजर झाला.