बेळगाव लाईव्ह : दलित समाजातील नेत्याची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी हि मागणी आजची नाही तर आधीपासून होत आलेली मागणी आहे. दलित समाजाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी हि केवळ काँग्रेस पक्षात नसून भाजप, जेडीएसमध्येही आहे.
आजवर कोणत्याही पक्षातील दलित समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळणे शक्य झाले नाही अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
समाज कल्याण मंत्री डॉ. एच. सी. महादेवाप्पा यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करत सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. गेल्या २० वर्षांपासून मल्लिकार्जुन खर्गे, २०१३ साली डॉ. जी. परमेश्वर यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. मात्र उभयतांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. मीदेखील कित्येकवेळा दलित समाजाच्या मुख्यमंत्र्यांची मागणी केली असून आजतागायत हि मागणी सत्यात उतरली नाही. अनुसूचित जाती आणि जमातीलमधील मतदार मोठ्या संख्येने काँग्रेसला मतदान करतात. काँग्रेसच्या बाजूने मागासवर्गीय, दलित समाजातील सैनिक अधिक आहेत मात्र या सैनिकांचे नेतृत्व करण्यासाठी नेतृत्व नसल्याचे मत सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
नेतृत्व तयार करावं लागत. मात्र प्रत्येक पक्षातील हायकमांडला दलित समाजाच्या नेतृत्वाबद्दल प्रभावित करण्यात अपयशच आले. लोकसभा निवडणुकीनंतर दलित मुख्यमंत्री प्रश्नी आवाज नक्की उठवणार असून तूर्तास लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या, राजकारण्यांच्या उपस्थितीत येत्या दोन ते तीन दिवसात पुन्हा एक बैठक घेणार असून या बैठकीनंतर दुसऱ्या यादीत बेळगाव आणि चिकोडी मतदार संघाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती जारकीहोळी यांनी दिली. शिवाय जिल्ह्यात धनगर समाजाला आमदारकीसाठी संधी मिळाली नसून यादृष्टीकोनातून जिल्ह्यातील दोन मतदार संघात धनगर समाजाला संधी देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे, मात्र अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचेही ते म्हणाले.
नगर विकास प्राधिकरणासंदर्भात बेळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चेला नकार देत बेळगाव बुडा आणि काडासाठी अद्याप बराच अवधी असून दोन्हीठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर लक्ष्मण सवदी यांना देखील संधी देण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.