Saturday, December 21, 2024

/

४५२४ मतदान केंद्रे, ४०६२२१० मतदार.. अशी असेल बेळगावची निवडणूक प्रक्रिया…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भारतीय निवडणूक आयोगाने शनिवार दि. १६ मार्च रोजी निवडणूक वेळापत्रक जाहीर केले असून ७ मे रोजी बेळगाव लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून संपूर्ण देशभरात मतमोजणी प्रक्रिया ४ जून रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

१२ एप्रिल ते ६ जून या कालावधीत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडणार असून १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. २० एप्रिल रोजी अर्जाची छाननी, २२ एप्रिल अर्ज माघारी घेणे, ७ मे रोजी मतदान, ४ जून रोजी मतमोजणी अशा पद्धतीने निवडणूक पार पडणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया ६ जून रोजी संपुष्टात येणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात एकूण दोन मतदार संघासाठी निवडणूक होणार असून निपाणी, चिकोडी-सदलगा, अथणी, कागवाड, कुडची, रायबाग, हुक्केरी, यमकनमर्डी, अरभावी, गोकाक, बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग, खानापूर, कित्तूर मधून ४०६२२१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी २०३५७३१ पुरुष मतदार, २०२६३०४ महिला मतदार तर १७५ इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ५६०६८ अपंग तर ८० वर्षावरील ४५००० मतदार आहेत.

जिल्ह्यात मतदारसंघनिहाय एकूण ४५२४ मतदान केंद्रे असून १०८५९६ तरुण मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी एकूण 64 चेकपोस्ट उभारण्यात येणार असून प्रत्येक चेक पोस्टवर ३ एसएसटी अधिकारी आणि पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी भरारी पथके, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम, एसएसटी टीम स्थापन करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे विविध ठिकाणी १६ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून चिकोडीसाठी बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बेळगाव जिल्ह्यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.

आचारसंहिता काळात सरकारी विश्रामगृहात कोणतेही राजकीय उपक्रम राबविण्यावर तसेच सरकारी वाहनांच्या वापरावर बंदी असेल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदली प्रक्रिया होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय रजा घेता येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. निवडणुकीच्या कामासाठी खास नेमलेले सहाय्यक निवडणूक अधिकारी, सहायक आयुक्त, निवडणुकीच्या कामात व्यस्त असणारे तहसीलदार व इतर कर्मचारी, अधिकारी यांनी निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कामासाठी केंद्राबाहेर जाऊ नये, असे कळविण्यात आले आहे.Press conference

संपूर्ण जिल्ह्यात राजकीय सभा, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कार्यक्रमांना मनाई आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच सभा-समारंभ-कार्यक्रम आयोजित करावे, असे जनतेला कळविण्यात आले आहे. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या सर्व सरकारी योजनांना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी भित्तिचित्रे, कटआऊट, बॅनर हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नव्या मतदारांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ९ एप्रिल पर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही निवडणूक अत्यंत शांततेत मुक्त, निष्पक्ष व निःपक्षपातीपणे पार पडावी यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.