बेळगाव लाईव्ह : गुरुवारी मनपा सभागृहात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बेकायदेशीर बांधकामासंदर्भात नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबराई केली. यादरम्यान बांधकाम परवानगीसाठी देण्यात आलेल्या फायली गायब होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी कि, प्रभाग क्र. ३२ मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने मोठी इमारत उभी केली आहे. इमारत उभी करताना रितसर परवानगीची मागणी केली होती. मात्र, जाणूनबुजून परवानगी देण्यात आली नाही. संबंधित व्यावसायिकाने कायद्याच्या चौकटीत इमारत बांधली. मात्र, त्याविरोधात एका नगरसेवकाने जोरदार तक्रार केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे केवळ त्या इमारतीबाबतच इतका अट्टाहास का? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे. या इमारत बांधकामाची फाईलदेखील गायब झाली आहे, असा आरोप या बैठकीत करण्यात आला. अधिकाऱ्यांकडून उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी बैठकीतून निरोप घेतला.
स्थायी समितीच्या बैठकीत घडलेल्या प्रकारावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असून महानगरपालिकेची मालमत्ता कोठे आहे? त्या मालमत्तेमध्ये अतिक्रमण होत आहे का? रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकामे होत आहेत. या सर्व समस्यांकडे महानगरपालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. यामुळे एक दिवस महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाचीही विक्री होण्याची शक्यता एका नगरसेवकाने अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या जागांबाबत उच्च न्यायालयामध्ये खटले दाखल आहेत. ते खटले निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेकांनी बांधकामे बेकायदेशीर केली असताना आतापर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई केली नाही. गेल्या वर्षभरात एक तरी कारवाई झाली आहे का? झाली असेल तर त्याची माहिती द्या, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. केवळ कायदा सांगत महानगरपालिकेची जागा गायब होत असेल तर आम्ही नगरसेवक म्हणून काय करायचे? महानगरपालिकेची ही इमारतदेखील एखाद्या व्यक्तीच्या नावावर विक्री करण्यास कोणीही मागेपुढे पाहणार नाही, अशी संतापजनक प्रतिक्रियाही नगरसेवकांनी बैठकीत व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम, तसेच इतर विभागांची समन्वय कमिटी नेमून अतिक्रमण विरोधात मोहीम राबवावी, अशी मागणी या बैठकीत नगरसेवकांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनीही एकत्रपणे काम करून शहरातील होणारे अतिक्रमण हटविण्याचे ठरविण्यात आले. हा सल्ला फायदेशीर ठरणार कि नगरसेवकांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.