बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील कणकुंबी तपासणी नाका येथे एसएसटीच्या अधिकाऱ्यांनी एका वाहनातील सबळ कारण व अधिकृत कागदपत्रे नसलेली 7 लाख 98 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
खानापूर विधानसभा मतदार संघातील कणकुंबी तपासणी नाका (चेक पोस्ट) येथे गोव्याहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या संजय बसवराज रेड्डी (रा. गांधीनगर, वन्नुर, बैलहोंगल) यांच्याकडून सदर रक्कम जप्त करण्यात आली.
एसएसटीच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून पोलिसांच्या मदतीने रेड्डी यांचे वाहन (क्र. केए 29 एफ 1532) अडवून झडती घेतली. त्यावेळी त्या वाहनामध्ये 7 लाख 98 हजार रुपयांची रोकड सापडली घटनास्थळी त्या रकमेसंदर्भात संजय रेड्डी यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही.
त्याचप्रमाणे इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक करण्याचे सबळ कारण देता आले नाही किंवा त्यासंबंधीची अधिकृत कागदपत्रेही सादर करता आली नाहीत.
त्यामुळे एसएसटीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रक्कम ताब्यात घेऊन ती सहाय्यक निवडणूक अधिकारी 14 -खानापूर विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे अधिक चौकशीसाठी जमा केली आहे.