बेळगाव लाईव्ह:कर्नाटक सरकारच्या विधीमंडळ अधिवेशनाविरोधात शिनोळी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी 4 डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन केले होते. या प्रकरणी 20 समिती नेत्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
आता या आंदोलनप्रकरणी बुधवारी 6 रोजी चंदगड न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कर्नाटक सरकारने हलगा येथे हिवाळी अधिवेशन आयोजित केले होते. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलनाची हाक दिली होती. पण, प्रशासनाने ऐनवेळी आंदोलनाला परवानगी नाकारली.
त्यामुळे समिती कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्ग अडवून आंदोलन केले. चंदगड पोलिसांनी याप्रकरणी परवानगी न घेता आंदोलन केले, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण केला, असा ठपका ठेवत समिती नेत्यांवर गुन्हा नोंदवला होता.
माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर,प्रकाश मरगाळे, मदन बामणे अॅड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, चंद्रकांत कोंडुसकर, दिनकर पावशे, श्रीपाद अष्टेकर, शुभम शेळके, लक्ष्मण मनवाडकर, माजी आमदार दिगंबर पाटील, नेताजी जाधव, गोपाळ देसाई, मालोजी अष्टेकर, गोपाळ पाटील, सरिता पाटील, निखील देसाई, प्रकाश अष्टेकर, मुरलीधर पाटील आदींवर गुन्हा नोंद आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता चंदगड पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक यांच्या समोर हजर राहावे लागणार आहे.
दरम्यान कोल्हापूर पोलीस अधीक्षकांची भेट घेत समिती नेत्यांवरील केस मागे घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती त्यावेळी पोलीस अधीक्षक पंडित यांनी सदर गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन दिले होते तरीही पोलिसांनी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.