बेळगाव लाईव्ह :देशातील विशेष करून कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र वगैरे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या हुंडीमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 11.23 कोटी रुपयांची घसघशीत रक्कम जमा झाली आहे. मागील वर्षाच्या संकलनाच्या तुलनेत यावेळी 2.40 कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे.
सौंदत्ती येथील यल्लम्मनागुड्डा अर्थात श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर हे दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून सुपरिचित आहे. जे कर्नाटक गोवा व महाराष्ट्रसह देशाच्या विविध कानाकोपऱ्यातील भक्तांना आकर्षित करते.
ही भक्त मंडळी मंदिराच्या हुंडीमध्ये रोख, सोने आणि चांदीचे दागिने अर्पण करून त्यांची श्रद्धा -आदर व्यक्त करतात. या पद्धतीने मंदिराच्या हंडीत पैसे आणि दागिने कोट्यावधीने जमा होत असतात.
यावर्षी प्रतिकूल हवामान असूनही त्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2022-23 या कालावधीत भक्तांनी रुपये 8.83 कोटी रोख, रुपये 66.28 लाख किमतीचे सोन्याचे दागिने आणि रुपये 15.43 लाख किमतीचे चांदीचे दागिने यल्लम्मा देवीला अर्पण केले होते.
पाठोपाठ त्यानंतरच्या 2023-24 या आर्थिक वर्षात भक्तांकडून रुपये 10.22 कोटी रोख, रुपये 84.14 लाख सोने आणि रुपये 16.65 लाख चांदीचे दागिने हुंडीमध्ये जमा करण्यात आले आहेत. श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर व्यवस्थापनाने नुकतीच शुभमुहूर्तावर हुंडी उघडून प्रथम दान स्वरूपात जमा झालेले पैसे आणि दागिन्यांचे पूजन केले. यावेळी हॉलमध्ये नोटा आणि नाणी यांचा खच पडलेला पहावयास मिळत होता.
मंदिराच्या विश्वासू कर्मचारीवर्गाकडून सर्व रोख रक्कम आणि नाण्यांच्या स्वरूपातील पैशाची छाननी करून मोजदाद करण्यात आली. यावेळी हुंडीतील पैशांमध्ये काही विदेशी चलनं देखील आढळून आली. देवीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचे मूल्यमापन आणि पैशाची मोजदाद प्रक्रियेप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.