बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहराला 101 दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या राकसकोप जलाशयामध्ये उपलब्ध असून दररोज 40 एमएलडी पाणी उपसा केला तरी येत्या 15 जूनपर्यंत पाणी पुरेल, अशी माहिती एल अँड टी कंपनी व कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाने दिली आहे. याखेरीज पाण्याचा उपसा 40 ऐवजी 35 एमएलडी केला तर 15 जुलैपर्यंत पाणी पुरवठा शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेमध्ये महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण व आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या उपस्थितीत काल बुधवारी पार पडलेल्या पाणी पुरवठा आढावा बैठकीत उपरोक्त माहिती देण्यात आली.
बैठकीस मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. त्यातही सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांची संख्या जास्त होती. शहरातील अपुरा पाणीपुरवठा आणि जलवाहिनीला लागणाऱ्या गळत्या यासह अन्य समस्या यावेळी नगरसेवकांनी मांडल्या.
महापौर सविता कांबळे यांनी संबंधित समस्या सोडवून शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जावा, अशी सूचना एल अँड टी कंपनी तसेच पायाभूत सुविधा मंडळाला केली. बैठकीतील चर्चेदरम्यान नगरसेवकांकडून अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार झाला.
गतवर्षी पावसाळ्यात राकसकोपच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला आहे. तत्पूर्वी 2022 मध्ये 2277 मि. मी. पाऊस झाला होता, तर गेल्या 2023 मध्ये केवळ 1776 मि.मी. पाऊस झाला आहे. तथापि 509 मि.मी. कमी पाऊस होऊन देखील गतवर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोप जलाशयात 2.30 फूट अतिरिक्त पाणीसाठा आहे.
गेल्या ऑक्टोबरपासून मार्कंडेय नदीच्या पात्रातून दररोज 32 एमएलडी पाण्याचा उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळेच राकसकोप जलाशयातील पाण्याची पातळी कमी झाली नसल्याचे सांगण्यात आले.