Sunday, January 5, 2025

/

बेळगाव लोकसभा मतदार संघावर मुसंडी कुणाची?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणूक आयोगानेही तयारी करण्यास सुरुवात केली आहे. येत्या १२ मार्च नंतर कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवाराच्या निवडीपासून रणनीती आखण्याचा मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

गेल्या चार निवडणुकींपासून बेळगाव लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपकडून विद्यमान खासदार मंगला अंगडी यांच्या उमेदवारीवरून अंतर्गत हालचाली सुरु असल्याचे समजते. मागील चारही निवडणुकीत दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या माध्यमातून भाजपचा बेळगाव लोकसभा मतदार संघावर वरचष्मा राहिला आहे. सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मंगला अंगडी यांना उमेदवारी देण्यात आली, आणि पोटनिवडणुकीत देखील भाजपनेच मुसंडी मारली.

सध्या होऊ घातलेल्या निवडणुकीत कै. सुरेश अंगडी यांची कन्या आणि माजी मुख्यमंत्री तसेच सुरेश अंगडी यांचे व्याही जगदीश शेट्टर यांची स्नुषा श्रद्धा अंगडी – शेट्टर यांना उमेदवारी देण्यासंदर्भात देखील हालचाली सुरु असल्याचे समजते. श्रद्धा अंगडी यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी हायकमांडकडे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

अंगडी कुटुंबीयांसोबतच राज्याच्या राजकारणातील महत्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या जारकीहोळी कुटुंबातील अरभावी मतदार संघाचे आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांचीही नावे चर्चेत असून या चार इच्छुकांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.Map belgaum lokssbha

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दोन दिवस बेळगाव दौऱ्यावर असून यादरम्यान ते भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्यादरम्यान भाजपच्या उमेदवाराचे नाव निश्चित होऊ शकेल, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

दुसऱ्या बाजूला राज्यात सत्तेवर असणाऱ्या काँग्रेसकडूनही बेळगाव लोकसभा मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार, महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि यमकनमर्डी मतदार संघाचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी हि जोडगोळी बेळगाव लोकसभा मतदार संघ काबीज करण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्याचे चित्र आहे.

१९९९ साली बेळगाव लोकसभा मतदार संघ काँग्रेसकडे होता. अमरसिंह पाटील यांनी भाजपच्या बाबागौडा पाटील यांचा तब्बल ५०००० मतांनी पराभव करत बेळगाव लोकसभा मतदार संघावर बाजी मारली होतील. त्यानंतर मात्र काँग्रेसला बेळगाव लोकसभा मतदार संघ काबीज करता आला नाही. काँग्रेसमध्ये उमेदवारीसंदर्भात आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर, डॉ.  सोनवलकर आणि. एस. एस साधुण्णवर आणि माजी खासदार अमरसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहे. राज्यात देण्यात येत असलेल्या हमी योजनांच्या जोरावर तसेच हेब्बाळकर आणि जारकीहोळी यांच्या जिल्ह्यावर असलेल्या वरचष्म्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघाची विजयश्री काँग्रेसला खेचून आणता येईल का? याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.

दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी मतांची टक्केवारी आणि मराठी मतदारांच्या संख्येचे शक्तिप्रदर्शन घडविण्यासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला होता. या निवडणुकीनंतर समितीचीही व्होटबँक महत्वाची ठरत आहे.

मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगातून अद्याप उमेदवारीबाबत चर्चा पुढे आली नाही. असे असले तरी कार्यकर्त्यांमध्ये आणि दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांमध्ये यंदाच्या निवडणुकीतही समितीने उमेदवार उभा करावा या दृष्टिकोनातून तयारी सुरु आहे. समितीची निर्णायक मते भाजप आणि काँग्रेसच्या वाटचालीत नक्कीच परिणामकारक ठरू शकणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनेही सीमाभागातील मराठीपणाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

एकंदर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या निवडणुकीत पुन्हा भाजपाच मुसंडी मारणार? किंवा राज्यातील काँग्रेस सरकारची जादू बेळगाव लोकसभा मतदार संघात दिसून येणार? किंवा उमेदवार कितीही तगडा असला तरी समितीने दिलेल्या उमेदवारीमुळे, मराठी भाषिकांच्या निर्णायक मतांमुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांवर मोठा परिणाम होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.