बेळगाव लाईव्ह:बेळगाव लोकसभा निवडणुकीचा आखाडा आता रंगू लागला असून नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यामध्ये मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या प्रचाराला वेग आणला आहे.
राजकीय प्रतिस्पर्धी असलेले मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे दोन्ही नेते आखाड्यात उतरल्यामुळे लोकसभा निवडणुकीचा रंग आणखी वाढला आहे. नुकताच लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्ह्यातील अनेक भागांचा झंझावाती प्रचार दौरा केला. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना पुन्हा भाजपमध्ये आणण्यात प्रमुख भूमिका निभावणारे माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी निवडणूक आखाड्यात उतरत नुकतीच शेट्टर यांची भेट घेऊन चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीसाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर ज्या बेळगाव लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, त्यामध्ये दोन्ही जारकीहोळी बंधूंचे मतदारसंघ आहेत. दरवेळी गोकाक आणि अरभावी हे दोन लोकसभा मतदारसंघ उमेदवाराला निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असतात.
सध्या बेळगाव आणि चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील निवडणूक आखाड्यामध्ये मंत्र्यांची मुले विरुद्ध भाजप अशी प्रचाराची रंगत वाढत आहे. विजयासाठी काँग्रेसने संपूर्ण ताकद पणाला लावली असली तरी मतदार आपला आशीर्वाद कोणाला देणार? हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव काळात बेळगाव जिल्ह्यासाठी वितरित केलेले ऑक्सिजन हुबळी धारवाडला नेऊन येथील नागरिकांवर अन्याय केलेले जगदीश शेट्टर यांनी बेळगाव जिल्ह्याला काय दिले? मात्र आता ते बेळगावला कर्मभूमी म्हणत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील मतदारांना बकरा केले जात आहे, असे टीकास्त्र मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांच्यावर सोडले आहे. गोकाक येथे काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.