बेळगाव लाईव्ह :बेळगावला भाजपचा आयात केलेला उमेदवार मिळेल जो स्थानिक भागातील नसेल, असे वृत्त कन्नड प्रादेशिक वाहिन्या प्रसिद्ध करत आहेत. त्यामुळे भाजपच्या गोटात बेळगावमधून एकही सक्षम उमेदवार नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून यासंदर्भात सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कन्नड वृत्तवाहिन्यांकडून बेळगाव मतदार संघासाठी भाजपला बाहेरून उमेदवार आयात करावा लागणार असे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे. याद्वारे बेळगावमधील भाजपचा कोणताच उमेदवार लोकसभेसाठी लायक नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केले जात असल्यामुळे ते खरे आहे की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. सोशल मीडिया मंचावर यासंदर्भात चर्चेला ऊत आला आहे. एका नेटकऱ्याने सध्याच्या पंतप्रधानांनी पुन्हा सत्तेत यावे आणि पुन्हा एकदा दिसावे अशी आम्हा भारतातील नागरिकांची इच्छा असेल, तर ज्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल, मतदार त्याला निश्चितच आशीर्वाद देतील आणि तो विजय होईल, असे मत व्यक्त केले आहे. त्याला दुसऱ्याने उत्तर देताना त्यामुळे याआधीच्या निवडणुकांमध्ये दिसणाऱ्या ट्रेंडनुसार या वेळीही तीच परिस्थिती अनुभवास येणार असल्याचे म्हंटले आहे.
अन्य एकाने उमेदवार निवडण्याचा निर्णय भाजपचा…पण नेहमी लक्षात ठेवा की कोणाला विजयी करायचे हे ठरवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे…योग्य उमेदवाराला निवडून आणण्याची ही आपल्याला संधी असल्याचे मत व्यक्त केले आहे. कृपया स्थानिक उमेदवार द्या…, अशी मागणी करण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाचा विचार करणे चांगले, माझा अंदाज आहे जगदीश शेट्टर, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. जगदीश शेट्टर हे बेळगावसाठी भाजपचे उमेदवार म्हणून झळकणार आहेत, कारण भाजपच्या उच्चपदस्थांना माहित आहे की त्यांनी निवडलेला कोणताही उमेदवार इतरांना न जुमानता निवडून येईल. त्यामुळे बेळगावच्या विकासासाठी बेळगावच्या मतदारांनी दुसरा योग्य उमेदवार निवडावा. बेळगावात मेंढीच्या पोशाखात लांडगा नको. इराण्णा कडाडींना तिकीट द्यावे लागेल, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.
शरद पाटील आणि अनिल बेनके ही उत्तम व्यक्तिमत्त्वं…
कोणताही स्थानिक भाजप नेता चालेल. आम्हाला हुबळी येथील आयात नेता नको, नाहीतर पंतप्रधानांना स्वतः बेळगावातून निवडणूक लढवू द्या. हा हा हा त्याऐवजी ‘एमईएस’ ला अर्ज दाखल करायला सांगा. जर त्यांनी इतर जिल्ह्यातून उमेदवार निवडला तर आमचे मत ‘नोटा’ असेल. स्थानिक बेळगावात 1000+ चांगले उमेदवार मिळतील.. नीट शोधा. भाजप नेत्यांनो तुम्ही जो उमेदवार म्हणून निवडाल त्याला मतदान करण्याइतके आम्ही मूर्ख नाही.
जर त्यांनी हुबळीचा नेता निवडला तर लक्षात ठेवा बेळगावमध्ये काँग्रेसचा विजय 100 टक्के निश्चित आहे. कोणताही पक्ष असुद्या सगळे एकाच माळेचे मणी, काँग्रेस काय आणी भाजप काय? वॉशिंग मशीन झालंय.. भ्रष्टाचार करा भाजप मधे जा लगेच स्वच्छ. ना खाऊंगा ना खाने दूंगा विसरलेल्या भाजपचे मी ही खातो तुही खा, असं झालंय, असे मत ही व्यक्त होत आहे. या पद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.