बेळगाव लाईव्ह: :कर्नाटकात राजकीय दृष्ट्या बलवान असलेल्या बेळगाव जिल्ह्यात सध्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडवण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगावातील राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून ग्रामीण आमदार सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांचे नांव जवळपास निश्चित झाले असून चिक्कोडी मधून मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका तिचे नांव चर्चेत असून तेच शेवटी निश्चित होणार अशी लक्षणे दिसत आहेत.
दुसरीकडे भारतीय जनता पक्षात कांही नावांची चर्चा होत असली तरी नेमके कोणाला तिकीट मिळणार? यासंदर्भात गुणाकार -भागाकार करूनही निश्चित उत्तर मिळू शकलेले नाही. यावेळी पुन्हा बेळगाव लोकसभा मतदारसंघातून अंगडी कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असली तरी त्यात बदल झाला तर दुसऱ्या कोणाला उमेदवारी मिळणार? हा मात्र फुल्ल सस्पेन्स आहे.
याबाबतीत भाजप नेत्यांचेही एकमत नाही. या पद्धतीने भाजप गोटात म्हणाव्या तशा हालचाली नाहीत, फक्त चर्चाच ऐकावयास मिळत आहेत. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून अण्णासाहेब जोल्ले यांचे नांव आघाडीवर असले तरी उमेदवारी मिळविण्याच्या आखाड्यात भाजप नेते रमेश कत्ती हे देखील आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीसाठी चुरस असणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपच्या तिकिटाची मागणी करणाऱ्या माजी मंत्री रमेश कत्ती यांना यावेळी उमेदवारी मिळाली नाही तर त्यांची पुढील राजकीय कृती काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या मृणाल हेब्बाळकर यांनी आपल्या मातोश्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समवेत आतापासूनच ‘टेम्पल रन’ सुरू केली आहे. उमेदवारीसाठी ते सतत वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात राहत असून ‘मला उमेदवारी मिळाली पाहिजे’ हा एकच जप त्यांनी सुरू ठेवला असल्याचे समजते.
एकंदर सध्याचे बेळगावचे राजकारण कोणाच्याही डोक्यात न शिरणारे आणि कुठे काय चालले आहे हे कोणालाही न कळणारे झाले आहे एवढे मात्र निश्चित.