बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदारसंघात गोकाकचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांची इंट्री झाली आहे. उमेदवारी मिळवताना पासून माजी मुख्यमंत्री आणि बेळगावचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना शेट्टर गो बॅक अशा ट्रेंडचा विरोधाचा सामना करावा लागला होता.
मात्र बेळगाव मधून उमेदवारी मिळवण्यासाठी मोलाची भूमिका बजावलेले भाजपचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शेट्टर यांच्या समर्थनात बेळगावत एंट्री घेतली आहे. आगामी सोमवारपासून रमेश जारकीहोळी बेळगाव ग्रामीण दक्षिण आणि बेळगाव उत्तर मतदारसंघासाठी तळ ठोकून असणार आहेत आणि शेतकऱ्यांच्यासाठी जोरदार लॉबिंग करणार आहेत.
रमेश जारकीहोळी यांच्या बेळगाव एन्ट्री नंतर आता रमेश जारकीहोळी विरुद्ध असा लक्ष्मी हेब्बाळकर कलगीतुरा पुन्हा एकदा रंगणार आहे. त्या वाकयुद्धात कोण जिंकणार याविषयी कमालीची उत्सुकता लागली असून याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजप युवा नेते किरण जाधव यासह अन्य मान्यवरांनी गुरुवारी भाजप कार्यालयात उमेदवार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवडणुकी संदर्भात चर्चा केली. तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा रोवण्यासाठी पुढील रणनीती आखण्यात आली.
रमेश जारकीहोळी यांनी यावेळी बोलताना, भाजप कार्यकर्ते तळागाळापर्यंत जाऊन प्रचार करतील आणि जगदीश शेट्टर यांना बहुमतांनी निवडून आणतील आणि ‘अब की बार 400 पार’ हे नरेंद्र मोदींचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात युवा पिढी अग्रेसर असून भाजप उमेदवारांना निवडून आणेल, यात तिळमात्रही शंका नाही असे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले. जगदीश शेट्टर यांनी निवडणूक प्रचार आणि प्रसार या संदर्भात सल्ला सूचना केल्या.यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवडणूक रणनीती संदर्भात आपली मते मांडली.