बेळगाव लाईव्ह : होळी आणि धूलिवंदन सणादिवशीच दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होणार आहे.
यादरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दखल प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे.
सोमवार दि. २५ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या होळीसणादरम्यान दहावीचा पेपर देखील आहे. यावेळी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, वाहतूक सुरळीतपणे चालू राहावी, तसेच परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर रंग फेकू नये, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
ज्याठिकाणी दहावी परीक्षा केंद्र आहेत, त्याठिकाणी वाहतुकीला अडथळा होता कामा नये याची दखल घ्यावी, विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.