बेळगाव लाईव्ह :देशाच्या राजकारणाला आधीपासूनच घराणेशाहीची ओळख आहेच. आजवर काँग्रेसने राबविलेले घराणेशाहीचे धोरण आता हळू हळू भाजपसह विविध राष्ट्रीय पक्ष अवलंबू लागले असून बेळगाव मध्ये काँग्रेसपक्षाने पुन्हा घराणेशाहीतूनच दोन उमेदवार जाहीर केले असून दोन्ही उमेदवार हे विद्यमान मंत्रीमहोदयांचेच कौटुंबिक सदस्य आहेत, हे विशेष!
सोशल मीडियामुळे हल्ली तरुण आणि नव्या दमाच्या नेतृत्वाची मागणी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने बेळगाव आणि चिकोडी मतदार संघात दोन नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. बेळगावमधील विद्यमान महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांना तर चिकोडी मतदार संघातून विद्यमान सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी जाहीर करण्यात आलेले काँग्रेसचे उमेदवार हे उच्चशिक्षित पदवीधर असून कोट्यधीश आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आपल्या आई – वडिलांसोबत गेल्या काही वर्षात सामाजिक कार्यात दोन्ही नवख्या उमेदवारांनी झोकून दिले आहे.
कर्नाटकाच्या राजकारणातील किंगमेकर समजले जाणारे सतीश जारकीहोळी यांच्याकडून राजकारणाचे धडे घेतलेल्या प्रियांका जारकीहोळी यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून त्या आपल्या वडिलांच्या यमकनमर्डी मतदारसंघात सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या माध्यमातून सतत सामाजिक कार्य करत असतात. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथील रहिवासी आणि सतीश जारकीहोळी (बेळगाव जिल्हा पालकमंत्री) व शकुंतलादेवी यांची कन्या असलेल्या प्रियांका जारकीहोळी यांचा जन्म 16 एप्रिल 1997 रोजी झाला आहे. त्यांचे बंधू राहुल जारकीहोळी हे देखील आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. 2018 पासून काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्व मिळविलेल्या प्रियांका जारकीहोळी आपले वडील सतीश जारकीहोळी यांच्या मतदारसंघातील सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. काँग्रेस पक्षातील कोणतेही पद मिळालेले नसले तरी सतीश शुगर लिमिटेड, बेलगाम शुगर फॅक्टरी लिमिटेड, गाडीगाव रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, वेस्टर्न इन्फ्रा लिमिटेड, नेचर नेस्ट आर्टिकल्चर अँड फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड वगैरे 14 संघ संस्थांच्या संचालिका तथा भागीदार म्हणून त्या काम पाहतात.
बेळगाव लोकसभेसाठी निवडणूक लढविणारे काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर हे सिव्हिल इंजिनियर असून त्यांचा जन्म 6 एप्रिल 1993 रोजी झाला आहे. मूळचे खानापूर (जि. बेळगाव) तालुक्यातील हट्टीहोळी गावचे रहिवासी असलेले मृणाल हेब्बाळकर आपले वडील रवींद्र आणि आई लक्ष्मी हेब्बाळकर (राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री) यांचे राजकीय काम पाहतात. गेल्या 2013 पासून सक्रिय राजकारणात असलेले मृणाल हेब्बाळकर यांनी या काळात काँग्रेसच्या बेळगाव युवा शाखेचे उपाध्यक्षपद दोन वेळा सांभाळले आहे. मृणाल शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक व सौंदत्ती येथील हर्षा शुगर्सचे संचालक असलेले मृणाल हेबाळकर लक्ष्मीताई सौहार्द सहकारी नियमित या संस्थेचेही संचालक आहेत. त्याचप्रमाणे हर्षा बिल्डर अँड डेव्हलपर या फर्मचे ते भागीदार आहेत. सध्या ते बेळगाव ग्रामीण मतदारसंघात आपल्या आईच्या म्हणजेच विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गैरहजेरीत जास्तीत जास्त जनसेवा करण्यात व्यस्त असतात.
या दोन्ही चेहऱ्याच्या माध्यमातून बेळगावला तरुण नेतृत्व मिळाले असल्याची चर्चा सध्या बेळगावमध्ये सुरु आहे. शिवाय दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित पदवीधर असून बेळगावच्या समस्यांवर नव्या पद्धतीने विचार करून बदल घडवू शकतील, अशीही चर्चा रंगत आहे. मात्र दुसरीकडे विद्यमान लोकप्रतिनिधींच्याच मुलांना उमेदवारी जाहीर झाल्याने पक्षातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.