बेळगाव लाईव्ह : निवडणुका जवळ आल्या कि पक्षातील नेतेमंडळींचे नाराजीसत्र सुरु होते. नेमका असाच प्रकार सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सकाळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत केलेल्या सुतोवाचानंतर बेळगाव भाजपच्या नेतेमंडळींच्या बैठकांना ऊत आला आहे. त्यामुळे बेळगाव भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
बी. एस. येडुयुरप्पा यांच्या विधानानंतर विद्यमान खासदार मंगला अंगडी यांनीही जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी शेट्टर यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. अद्याप जगदीश शेट्टर यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी जगदीश शेट्टर यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्याचे चित्र होते.
जगदीश शेट्टर यांचे नाव बेळगाव लोकसभा निवडणुकीसाठी पुढे आल्यानंतर आज माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी आजी-माजी आमदार, खासदार आणि नेतेमंडळींनी बैठक घेतली असून या बैठकीनंतर बेळगाव भाजपमध्ये काही आलबेल सुरु आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी झालेल्या राजकीय बैठकीत माजी आमदार अनिल बेनके, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, डॉ. महांतेश कवटगीमठ यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. मात्र, या बैठकीपासून माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी आणि विद्यमान खासदार मंगला अंगडी यांनी फारकत घेतल्याचेही निदर्शनात आले. यामुळे भाजपमध्ये दोन गट जरी नसले तरी उमेदवारीच्या मुद्द्यावरून माजी आमदार – खासदार आणि काही नेतेमंडळींमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचेही दिसत आहे.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी नेतेमंडळींना प्रश्नांचा भडीमार केला. या दरम्यान अद्याप उमेदवारी अधिकृत जाहीर झाली नसून अधिकृत घोषणा झाल्यानंतर भूमिका स्पष्ट करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. जगदीश शेट्टर यांचे नाव अधिकृतपणे जाहीर झाले नसले तरी त्यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट आहे. मात्र शेट्टर यांचे नाव उमेदवारीसाठी सुचविल्यामुळे अंतर्गत गोटात लॉबिंग सुरु झाल्याचीही चिन्हे आहेत. यामुळे भाजपमध्ये अंतर्गत गटातटाचे राजकारण सुरु आहे का? या प्रश्नानेही डोके वर काढले आहे.
भाजपमध्ये अंतर्गत दोन गट पडले आहेत. स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा वाद रंगत आहे. त्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल नसून बेळगाव लोकसभा मतदार संघाचा बालेकिल्ला राखण्याच्या लढाई आधीच पक्षांतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.