बेळगाव लाईव्ह:खाजगी टूर ऑपरेटर्स मार्फत हज यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंनी फसवणूक टाळण्यासाठी संबंधित खाजगी टूर ऑपरेटरकडे हज यात्रेसाठी जाण्याचा अधिकृत परवाना आहे की नाही याची सर्वप्रथम खातरजमा करावी, असे आवाहन हज फाउंडेशन कोल्हापूरतर्फे करण्यात आले आहे.
आज फाउंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे आज आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त आवाहन करण्यात आले. दरवर्षी सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी जाण्याकरता देशातील 80 टक्के यात्रेकरूंची सोय भारत सरकारच्या हज कमिटी ऑफ इंडियाच्यावतीने केली जाते.
त्याचप्रमाणे उर्वरित 20 टक्के यात्रेकरूंची हज यात्रेची सोय खाजगी टुरिस्ट कंपन्यांकडून केली जाते. मात्र अलीकडे सौदी अरेबिया सरकारच्या असे निदर्शनास आले आहे की अधिकृत परवाना असलेल्या टुरिस्ट कंपन्यांबरोबरच अन्य काही खाजगी टुरिस्ट कंपन्या बेकायदेशीर रित्या बेकायदेशीररित्या हज यात्रेकरूंना जड्डा व रियाद येथे घेऊन जात आहेत.
तेथून संबंधित यात्रेकरू पवित्र स्थळांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी त्यांना आडकाठी केली जाते. त्यामुळे पैन -पै जमा करून मेहनतीच्या पैशातून हज यात्रेला जाणारे जे आपले यात्रेकरू असतात त्यांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र यंदा सौदी अरेबिया सरकारच्या हज आणि उमरा मंत्रालयाने अशा पद्धतीने विनापरवाना आलेले जे लोक हज यात्रेच्या ठिकाणी आढळतील त्यांच्यासाठी 50 हजार सौदी रियाद म्हणजे भारतीय चलनात 11 लाख 5 हजार रुपये दंड, 6 महिन्याचा कारावास आणि 10 वर्षे सौदी अरेबियामध्ये प्रवेश बंदी अशा शिक्षेचा कायदा लागू केला आहे. त्यामुळे हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी आपली पुढील फसवणूक टाळण्यासाठी ते ज्या खाजगी टूर ऑपरेटर्स मार्फत हज यात्रेला जाऊ इच्छितात त्या टूर ऑपरेटर कडील अधिकृत परवान्याची सर्वप्रथम खातरजमा करून घ्यावी.
त्यानंतरच नाव नोंदणी करून पैसे भरावेत. लोकांची फसवणूक होऊ नये, त्यांना पुढे त्रास -मनस्तापाला सामोरे जावे लागू नये. त्यांची हज यात्रा अतिशय सुखकर होऊन ते सुखासमाधानाने स्वगृही परतावेत अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी भारत सरकार आणि सौदी अरेबिया सरकारचे जे काही नियम आहेत त्याचे पालन होणे आवश्यक आहे. यासाठीच हज फाउंडेशन कोल्हापूरतर्फे आम्ही ही जनजागृती करत आहोत, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.