बेळगाव लाईव्ह :सध्या उन्हाळ्यात काकडी आणि टरबूज यांना बाजारात मोठी मागणी आहे. मात्र त्याची विक्री करण्यास जाणाऱ्या शेतकरी महिलांना बस मध्ये प्रवेश नाकारला जात असल्यामुळे संबंधित संतप्त महिलांनी बस रोको आंदोलन छेडल्याची घटना आज दुपारी येळ्ळूर येथे घडली.
येळ्ळूरचा बासमती भात प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात या ठिकाणच्या टरबूज आणि काकडीला देखील बाजारात मोठी मागणी असते. येळ्ळूर भागासाठी परिवहन मंडळाची नियमित बस सेवा आहे. मात्र या बसेसच्या काही वाहक -चालकांकडून मनमानी केली जात असल्यामुळे शेतकरी महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या टरबूज आणि काकडीचा मोसम सुरू आहे. त्यांची येळ्ळूर येथून शहरात मोठी आवक होत असते. शेतकरी महिला काकडी व टरबूज बसमधून बेळगाव शहरात घेऊन जात असतात. यासाठी सकाळच्या वेळी या सर्व महिला येळ्ळूर वेशीवरील शिवसेना चौक, विराट गल्ली येळ्ळूर येथील बस थांब्याच्या ठिकाणी येऊन थांबतात. मात्र सध्या काही मोजके वगळता उर्वरित बस वाहक -चालक रस्त्यावर विनंती वरून बस थांबत तर नाहीच, शिवाय बसमध्ये जागा रिकामी असतानाही बस थांब्यावर बस न थांबवता पुढे निघून जात आहेत.
यासंदर्भात शेतकरी महिलांनी बऱ्याचदा संबंधित बसचालक व वाहकाला किमान सध्याच्या काकडी टरबुजाच्या मोसमात महिनाभर तरी बस थांब्याच्या ठिकाणी बस व्यवस्थित थांबवण्याची विनंती केली आहे. सदर शेतकरी महिला त्यांच्या सोबत असलेल्या कृषी उत्पादनांच्या ओझ्याचे भाडे देण्यास तयार आहेत. त्याचप्रमाणे सध्या महिलांसाठी बस प्रवास मोफत असला तरी स्वतःची तिकीट काढण्यासही त्याची तयारी आहे. मात्र तरीही कांही बस वाहक -चालकांची मनमानी सुरूच आहे.
गेल्या कांही दिवसांपासून हा प्रकार आपल्या बाबतीत जाणून बुजून केला जात आहे याची जाणीव होताच आज सकाळपासून बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या काकडी व टरबूज विक्रेत्या संतप्त शेतकरी महिलांनी दुपारी 12:30 च्या सुमारास वेशीवरील बस थांब्याच्या ठिकाणी बस अडवली. तसेच बस समोर टरबूज, काकडी असलेल्या बुट्ट्या ठेवून त्यांनी बस रोको करत निषेध नोंदवला.
अखेर येळ्ळूर ग्रामस्थ आणि शिवसेना तसेच स्थानिक युवक मंडळाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर शेतकरी महिलांनी बस रोको मागे घेतला. यावेळी बस चालक व वाहकाच्या मनमानीसंदर्भात येत्या बुधवारी परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.