बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील न्यू वंटमुरी येथे महिलेवर हल्ला करून तिची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी तपासांती सीआयडी पोलिसांनी 12 आरोपीं विरुद्ध बेळगाव चतुर्थ जेएमएफसी न्यायालयामध्ये आरोप पत्र दाखल केले आहे.
गावातील युवती आपल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या युवतीच्या कुटुंबीय व नातलगांनी प्रियकराच्या आईला मारहाण करून तिची विवस्त्र धिंड काढण्याची, तिला खांबाला बांधून घातल्याची घटना अलीकडे न्यू वंटमुरी येथे घडली होती.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय मानव हक्क आयोग आणि भाजप सत्यशोधक समिती यांनी बेळगावला येऊन पीडित महिलेची भेट घेण्याद्वारे तिचे सांत्वन केले होते.
याप्रकरणी प्रारंभी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवला होता.
सीआयडी अधिकाऱ्यांनी पीडित महिलेची भेट घेण्याबरोबरच घटनास्थळी तपास करून, त्याचप्रमाणे गावकऱ्यांकडून माहिती घेऊन आपले तपास कार्य पूर्ण केले आहे. तपासांती सीआयडीने 12 आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.