बेळगाव लाईव्ह :बेळगाव दक्षिण मतदार संघातील वाजपेयी आश्रय योजनेअंतर्गत घरे बांधून आम्हाला लाभार्थींना त्यांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी तिसरा क्रॉस महाद्वार रोड, शहापूर येथील 300 गरीब कुटुंबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महाद्वार रोड परिसरातील गरीब कुटुंबातील गृहिणी महिलांनी आज गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमून उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. महापालिकेच्या वाजपेयी आश्रय योजनेसाठी आम्ही 300 कुटुंबांनी कर्ज काढून 50 ते 66 हजार रुपये भरले आहेत. पैसे भरलेल्याची पावती देण्यासह आम्हाला घरासंदर्भात पत्रही आली आहेत. मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या घरांना मंजुरी मिळालेली नाही. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास लवकरच घरे बांधले जातील असे सांगितले जात आहे. सर्व अधिकारी जागा मंजूर झाली असल्यामुळे तुम्हाला घरे मिळणार आहेत, लवकरच घरांच्या बांधकामाला कामाला सुरुवात होणार आहे असे आश्वासन देत आहेत. मात्र आजतागायत आम्हाला घरे मिळालेली नाहीत. गेल्या सुमारे 12 वर्षापासून आम्ही स्वतःच्या मालकीच्या घराची प्रतीक्षा करत आहोत. महापालिका अधिकाऱ्यांकडून मात्र घरे बांधून देणार या आश्वासनापलीकडे कोणतीही कृती केली जात नाही आहे. तरी याप्रकरणी गांभीर्याने वाजपेयी आश्रय योजनेतील घरे लवकरात लवकर बांधून पूर्ण केली जावीत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी शंकरावा मांगुंडनवर, शारदा बसवंतप्पा तोरगल, श्वेता इराण्णा कुंभार कस्तुरी शंकर इटगी आदींसह बहुसंख्या गृहिणी महिला उपस्थित होत्या.
आपल्या मागणी संदर्भात बोलताना एक महिला म्हणाली की, बेळगाव दक्षिणचे आमदार यांनी 2012 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान गरिबांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देऊन अर्ज करण्यास सांगितले होते. त्यावेळी आम्ही बहुसंख्य लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर ज्यांची स्वतःची घरे नाहीत अशा सर्वांचे सर्वेक्षण झाले आणि योजनेसाठी निवड झालेल्यांनी घरासाठी 25 -50 हजार रुपयांची रक्कम देखील भरली. मात्र त्यानंतर पाच -सहा वर्षे गेली. तसेच दक्षिणचे आमदार त्यावेळी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ती योजनाच बारगळली. पुढे 2017 मध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा पुढाकार घेऊन आम्हा सर्वांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते.
त्या घरकुल योजनेसाठी हजार लोकांनी अर्ज केले होते. त्यापैकी 500 लोकांनी कंटाळून आपले पैसे योजनेतून काढून घेतले आहेत. सदर घरकुल योजनेसाठी लोकांनी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून पैसे भरले आहेत. आधीच गरीब असलेल्या आम्हा लोकांना अद्याप घर तर मिळाले नाहीच मात्र भाड्याच्या घरात राहून निष्कारण व्याजाचा भर्दंड सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांकडे घराबाबत विचारणा केल्यास तुम्हाला घरे देणार आहोत, लवकरच मीटिंग होणार आहे, अशी उडवा उडवीची उत्तरे गेल्या दहा-बारा वर्षापासून दिली जात आहेत.
उद्यमबाग परिसरात बेम्को कंपनी जवळ या निवासी योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही झाला होता. मात्र त्यानंतर निवासी योजनेचे बांधकाम वगैरे कोणतीच कार्यवाही झालेले नाही असे सांगून गेल्या 12 वर्षापासून महापालिकेचे अधिकारी आमच्याकडून सर्व तयारी झाली आहे फक्त बुडाकडून मंजुरी मिळताच तुमचं घराचं काम होणार आहे एवढेच सांगत आहेत, अशी व्यथा त्या महिलेने मांडली.