बेळगाव लाईव्ह:वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बेळगाव मधून आंतरराज्य प्रवासासाठी सर्व बसेसमध्ये यूपीआय आधारित पेमेंट सुरू केले आहे. बेळगाव विभागात सहा डेपो असून शहर वगळता पाच आगारांमध्ये बस तिकिटांसाठी यूपीआय पेमेंट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
यूपीआय पेमेंट सुविधेअंतर्गत प्रवासी त्यांच्या फोन मधील यूपीआय ॲप्सच्या माध्यमातून बस वाहकाकडे प्रवास भाड्याचे यूपीआय पेमेंट करू शकतील.
परिवहन मंडळांनी यूपीआय पेमेंट सिस्टीम सुरू केल्यामुळे कोल्हापूर, पुणे, मुंबई अशा महाराष्ट्रातील शहरांना तसेच म्हापसा, फोंडा, पणजी वगैरे गोवा राज्यात जाणारे आंतरराज्य प्रवासी बसमध्ये तिकिटाचे डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत.
परिवहन मंडळाने आपल्या 813 बसवाहकांच्या नावावर क्यूआर कोड तयार केले असून प्रवाशांनी भरलेले भाडे थेट वायव्य परिवहन महामंडळाच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
सदर डिजिटल पेमेंट सिस्टीममुळे अखेर चिल्लरच्या तुटवड्याची समस्या मार्गी लागली असून चिल्लर वरून प्रवासी आणि बस वाहकात होणारा वादही मिटणार आहे.