Tuesday, May 28, 2024

/

पत्रकारिता क्षेत्रातील नवं समीकरण घडविलेल्या ‘बेळगाव लाईव्ह’ची सप्तपदी…

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष / संपादकीय : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात, सीमाभागासह देशभर आणि परदेशातही एक नवं समीकरण घेऊन आलेल्या आपल्या लाडक्या ‘बेळगाव लाईव्ह’ या डिजिटल न्यूज पोर्टलने आपल्या सर्वांच्या सहकार्याने ७ वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी बेळगावमधील पत्रकार विकास अकादमीच्या कार्यालयात छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आलेल्या ‘बेळगाव लाईव्ह’च्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तत्कालीन महापौर सरिता पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आलेले हे पोर्टल आज लाखो वाचकांच्या मनात विशिष्ट स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.

मराठी भाषा, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे या प्रमुख उद्दिष्टासह आपल्या सभोवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा बारकाईने आणि वेगवान आढावा घेणाऱ्या आमच्या ‘बेळगाव लाईव्ह’ पोर्टलने आजवर अनेक चढ-उतार पहिले. मागील ७ वर्षात अनेक गोष्टी साध्य केल्या. बेळगावचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती, शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक, गणेशोत्सव मिरवणूक यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण सलग २४ तास करत ‘बेळगाव लाईव्ह’ने विक्रम रचला. घरबसल्या प्रत्येक घटनेचा आढावा वाचकांना दिला. केवळ पत्रकारिता क्षेत्रच नाही तर सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रात आपली छाप उमटविली.

‘बेळगाव लाइव्ह’च्या माध्यमातून अनेकांना सहकार्याचा हात दिला. एका वेगळ्याच संकल्पनेतून उभारलेल्या ‘बेळगाव लाईव्ह’ न्यूज पोर्टलच्या स्थापनेदरम्यान अनेक शंका उपस्थित झाल्या. मात्र तोंडओळखही नसलेल्या या संकल्पनेने आज बेळगावकरांच्या दैनंदिन आयुष्याला रोजचे वळण लावले. सकाळी वाचल्या जाणाऱ्या बातम्या ‘बेळगाव लाईव्ह’ने तात्काळ वाचकांना उपलब्ध करून जागृती करण्याचे कार्य केले. पत्रकारिता क्षेत्रात उदयाला आलेल्या या नव्या संकल्पनेने पत्रकारिता क्षेत्राचीही समीकरणे बदलली.

 belgaum

‘बेळगाव लाईव्ह’ने आजवर अनेक घडामोडींचा जवळून परामर्श केला. यापैकी प्रामुख्याने ‘मराठा क्रांती मोर्चा’चे नाव घेता येईल. महाराष्ट्रभर पसरलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे लोण बेळगावपर्यंत येऊन पोहोचले. त्यादरम्यान ७ ते ८ लाख मराठा रस्त्यावर उतरले. या आंदोलनात ‘बेळगाव लाईव्ह’ने सिंहाचा वाटा उचलला. याचप्रमा पूणे सीमाभागातील मराठी भाषिकांचा कणा असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला बळ देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 7 years Design bgm live

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा .. प्रत्येक निवडणुकीत मराठी भाषिकांना एकसंघ करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच प्रामुख्याने समितीचा उमेदवार निवडण्यापासून प्रचाराचा धुमधडाका उडविण्याचे मोलाचे कामही ‘बेळगाव लाईव्ह’ने केले. निवडणुकीच्या काळात मराठी भाषिकांना पूरक अशी वातावरण निर्मिती तयार केली. जिथं कौतुक करण्यायोग्य काम असेल, तिथे पाठीवर थापही दिली आणि वेळप्रसंगी कानपिचक्याही दिल्या. सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये आलेली मरगळ दूर सारून नवचैतन्य निर्माण केले. ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून मराठी भाषिक सीमाभागातील परिस्थिती ओळखू लागला. बारकाईने परीक्षण करू लागला. आणि एव्हाना दबला गेलेला मराठी माणसाचा आवाज अन्यायाच्या विरोधात बाहेर येऊ लागला. मराठी भाषा, मराठी संस्कृती यासाठीच ‘बेळगाव लाईव्ह’ सुरुवातीपासून आजतागायत कार्यरत आहे.

‘बेळगाव लाईव्ह’ने अनेकविध सदरे प्रकाशित केली. आठवड्याचा माणूस, आबा घुमिव राजकारणाचं, सातासमुद्रापार बेळगाव, नवदुर्गा, गुरु-शिष्याच्या नात्यातून कानपिचक्या देणारे गाजलेले सदर ‘चिरमुरे-तुरमुरे’, अलीकडेच सुरु झालेले शब्दशिल्प हे पुस्तक जगतातील सदर… यासारख्या सदरांमधून नवनव्या संकल्पना समोर आणल्या. या सदरांच्या माध्यमातून मिळालेल्या प्रेरणेतून अनेक नवयुवकांनी यश संपादित केले. नवनव्या गोष्टी साध्य केल्या. क्रीडा, शिक्षण, शेती, संस्कृती, आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून प्रोत्साहन दिले.Live 7 years

‘बेळगाव लाईव्ह’ने राबविलेल्या या संकल्पनेमुळे आज घराघरातील प्रत्येक मोबाईलमध्ये ‘बेळगाव लाईव्ह’ हे नाव स्थान मिळवून आहे. दैनंदिन आयुष्याचा भाग झालेले ‘बेळगाव लाईव्ह’ बेळगावकरांच्या मनातून वजा करणे केवळ अशक्य आहे!

नेहमीच मराठीचा मुद्दा उचलून धरणारे ‘बेळगाव लाईव्ह’ हे डिजिटल न्यूज पोर्टल गेल्या ७ वर्षात बेळगावकरांसह सातासमुद्रापार लोकप्रिय होत आहे. आजवर ‘बेळगाव लाईव्ह’ने अनेक अडथळे पार केले. आज ‘बेळगाव लाईव्ह’ अनेक संकटांवर मात करून ८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. यापुढील काळातही सीमाभागासह सर्वत्र मराठी भाषा, संस्कृती जतन केली जावी आणि संवर्धन केले जावे यासाठी अशाच दिमाखाने कार्य करीत राहील. आजवर आपण सर्वांनी भरभरून प्रेम, कौतुक, आशीर्वाद दिले. यापुढील काळातही आपण असेच सहकार्य कराल, हि अपेक्षा.

संपादक..

 

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रज्ञान अवगत कराव- चंद्रकात पाटील, “बेळगाव लाईव्ह” वेब पोर्टलचे अनावरण

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.