बेळगाव लाईव्ह :शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका चारचाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे महागड्या वाहनांची सर्व्हिसिंग, देखभाल आणि विक्री करण्याचे गॅरेज आहे. या गॅरेज जवळील हेस्कॉमच्या मुख्य वीज वाहिनीचे आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन त्याची ठिणगी गॅरेजमध्ये पडली. परिणामी गॅरेजमधील टाटा जनन (क्र. केए 22 एमबी 4829) या चार चाकी वाहनासह अन्य साहित्याने पेट घेतला. गॅरेजमध्ये पेट्रोल, डिझेल वगैरे पडलेले असल्यामुळे अल्पावधीत आग भडकली आणि आगीमध्ये टाटा जननसह एअर कॉम्प्रेसर मशीन, टायर्स व अन्य साहित्य जळून खाक झाले.
प्रारंभी गॅरेजमधील कामगारांनी पाणी मारून तसेच अग्निशमन उपकरणाचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न मिळाल्यामुळे अग्निशामक दलाला प्राचारण करण्यात आले.
आगीची माहिती मिळताच सहाय्यक फायर ऑफिसर अरुण माळोदे यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान बाबू सामने, राजू मिटगार, भरतेश हलकर्णी व सदानंद राचन्नावर यांनी पाण्याच्या बंबासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
सदर दुर्घटनेत सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे गॅरेज गुरुदत्त हवालदार यांच्या मालकीचे असल्याचे समजते. सदर दुर्घटनेची उद्यमबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.