बेळगाव लाईव्ह : बेळगावसह ११ शहरांमध्ये रात्री १ वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भातील घोषणा आज सादर केलेल्या १५ व्या अर्थसंकल्प दरम्यान केली असून वाणिज्य आणि व्यापाराच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच वाहतूक कोंडीची समस्या निवारणार्थ साडेचार किलो मीटरचा फ्लाय ओव्हर बांधकामासाठी ४५० कोटी रुपये अनुदानाची विशेष तरतूद करून केंद्र सरकाराला सहयोग दर्शविला असल्यामुळे बेळगावकरांचे बहुप्रतीक्षित असलेले स्वप्न पूर्ण होणार आहे.
वाणिज्य आणि व्यापाराच्या हितासाठी यापुढे रात्री १ वाजेपर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी रात्री ११ पर्यंत व्यवसाय सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात नव्याने घोषणा केली असून आता यापुढे रात्री १ पर्यंत व्यावसायिकांना मुभा असणार आहे. बेळगावसह बेंगळुरू, बेळ्ळारी, दावणगेरे, हुबळी-धारवाड, कलबुर्गी, मंगळूर, म्हैसूर, शिमोगा, तुमकूर, विजयपूर आदी शहरांचा यामध्ये समावेश आहे.
याचप्रमाणे बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष अनुदानाची तरतूद केली आहे. वाहतूक कोंडीची समस्या निवारणार्थ साडेचार किलो मीटरचा फ्लाय ओव्हर बांधकामासाठी ४५० कोटी रुपये अनुदानाची विशेष तरतूद करून केंद्र सरकाराला सहयोग दर्शविला आहे.
फ्लाय ओव्हर निर्माण ही बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांची महत्वाकांक्षी योजना असून सदर योजना लागू करण्यासाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या.