बेळगाव लाईव्ह : शहरातील फुलबाग गल्ली येथील ड्रेनेज चेंबर फुटून दूषित पाणी नळाच्या आणि विहिरीच्या पाण्यात मिसळत असल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सदर समस्या हि २०१९ पासून जैसे थे आहे. याबाबत अनेकवेळा निवेदने सादर करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दूषित पाणी नळाच्या पाइपलाइनमध्ये मिसळत असल्याने ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत आहे.
आसपासच्या परिसरात असलेल्या विहिरींमध्येही ड्रेनेजचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दूषित पाण्यामुळे डासांचा उपद्रवही वाढला आहे. यामुळे रोगराई बळावण्याची शक्यता असून येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
सदर समस्या तातडीने सोडविण्यात यावी यासाठी आज मनपाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सिद्धगौडा नारायण सावंत यांना सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी निवेदन सादर केले.
या समस्येकडे तातडीने लक्ष पुरविण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.