बेळगाव लाईव्ह:सालाबाद प्रमाणे श्री समादेवी संस्थान बेळगाव तसेच वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ, समादेवी गल्ली यांच्यातर्फे आयोजित श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला आज मंगळवारपासून मोठ्या भक्तीभावाने उत्साहात प्रारंभ झाला आहे. सदर जन्मोत्सव 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवा अंतर्गत आज पहिल्या दिवशी परंपरेनुसार सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चौघडा, काकड आरती आणि कुंकुमार्चन हे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर श्री देवी दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून श्री सरस्वती वाचनालय शहापूरच्या अध्यक्षा स्वरूपा इनामदार उपस्थित होत्या.
त्यांच्या हस्ते श्रीदेवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भक्त मंडळींसह वैश्यवाणी बंधू -भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. श्रीदेवी दरबारानंतर दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होतील. याव्यतिरिक्त सायंकाळी 5 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी वेशभूषा, श्लोक पठण आणि वक्तृत्व या स्पर्धा घेतल्या जातील.
उद्या बुधवारी 21 रोजी सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चौघडा, काकड आरती व लक्ष पुष्पार्चन कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत विविध भजनी मंडळाचे भजनाचे कार्यक्रम होतील. गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत चौघडा, काकड आरती व श्रीला अभिषेक हे कार्यक्रम होतील.
त्यानंतर दुपारी 13 वाजता श्रीला मिष्टान्न व महानैवेद्य अर्पण केला जाईल. तसेच दुपारी 2 वाजल्यापासून ओटी भरणे कार्यक्रमाला सुरुवात होईल. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत पुराण वाचनाचा कार्यक्रम होणार असून 4 वाजता श्री च्या पालखी प्रदक्षिणेला प्रारंभ होईल. ही पालखी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली मार्गे समादेवी मंदिर अशी असणार आहे.
पालखी प्रदक्षिणेनंतर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य प्रदीप ट्रस्ट बेळगावचे अध्यक्ष प. पू. चित्प्रकाशानंद सरस्वती स्वामीजी उपस्थित राहणार आहेऔ. जन्मोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी 23 रोजी सकाळी 6:30 ते 11 वाजेपर्यंत नवचंडीका होम होणार असून दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत श्री समादेवी सभागृह बेळगाव येथे प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. तरी वैश्यवाणी समाज बांधवांसह शहरातील भाविकांनी उपरोक्त कार्यक्रमांना बहुसंख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.