बेळगाव लाईव्ह :भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील यांनी मागील ३५ वर्षांपासून पक्ष संघटना आणि विविध कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपमधून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक होते मात्र भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली. आजवर पक्षासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.आज कामगार संघटनेचे वकील एन. आर. लातूर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील खाजगी हॉटेलमध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हि मागणी पुढे करण्यात आली आहे.
शंकरगौडा पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने दक्षिण मतदार संघात आहे. याच गोष्टीला अनुसरून त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र पक्षाने त्यांना उत्तर मतदार संघातून निवडणूक लढविण्यास सुचविले. पक्षाच्या आदेशाचे पालन करून शंकरगौडा पाटील यांनी आपली इच्छा माघारी घेतली.
मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत शंकरगौडा पाटील यांनी संधी देण्यात आली तर नक्कीच भाजपाकडे विजयश्री येईल, असे मतदारसंघातील मतदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदार संघातून शंकरगौडा पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेला एन. आर. लातूर, स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र कलघटगी, उद्योजक एच. डी. काटवा, चंद्रकांत मजगी, समाजसेवक मदनकुमार भैरप्पनवर, माजी नगरसेवक नीलकंठ मास्तमर्डी, बेळगाव तालुका कृषी समाज संस्थापक ऍड. विजय पाटील, ज्येष्ठ वकील किवडसन्नावर आदी उपस्थित होते.