बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास (दुरुस्ती) विधेयक विधानसभेच्या कामकाजात मंजूर करण्यात आले आहे.
या विधेयकामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांना पुन्हा नव्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असे संकेत दिसत असतानाच आज विधानसभेत बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सदर विधेयकासंदर्भात आपले विचार व्यक्त करत बेळगावच्या भाषा संस्कृतीबद्दल मुद्दा उपस्थित केला.
कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास (दुरुस्ती) विधेयक संदर्भात सभापतींनी आज आपले मत मांडण्याची संधी विधानसभा सदस्यांना दिली. यावेळी सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या भाषा संस्कृतीबद्दल बोलताना, बेळगावची संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगत बेळगाव हि गोवा आणि महाराष्ट्राची सीमा असून या भागातील जनतेत विविधतेत एकता दिसून येत असल्याचे सांगितले.
बेळगाव हा सीमाभाग असून या भागात कन्नड आणि मराठी भाषा सारख्याच बोलल्या जातात, येथील मुले कन्नड आणि मराठी माध्यम शाळेत समान रीतीने जातात, बेळगाव जिल्ह्यात भाषाभेद नाही, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, सीमाभागात जे वातावरण ७० च्या दशकात होते तसे वातावरण सध्या आता राहिले नसून खानापूर आणि निपाणी भागातील लोक मराठी बरोबरच कन्नड भाषाही समान पद्धतीने बोलतात. त्यामुळे सदर दुरुस्ती विधेयक विचारपूर्वक मांडावे, असे मत सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.