Sunday, December 29, 2024

/

रिंग रोड म्हणजे बेळगावसाठी मोठे यश -मंत्री गडकरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:गेल्या 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आमचे सरकार आले त्यावेळी कर्नाटकमध्ये फक्त 6707 कि.मी. अंतराच्या लांबीचा महामार्ग होता. आता 2024 मध्ये ही लांबी जवळपास 8200 की.मी. इतकी झाली आहे. बेळगावचा रिंग रोड कामाची आज सुरुवात होत असून हे बेळगावसाठी मोठे यश आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नियोजित बेळगाव रिंग रोडसह अन्य विविध विकास प्रकल्पांचा भूमिपूजन व कोनशीला समारंभ आज गुरुवारी दुपारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने केंद्रीय मंत्री गडकरी बोलत होते. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर प्रारंभी म्हैसूरी पगडी व शाल घालून व श्री गणेशाची मूर्ती स्मृती चिन्हादाखल देऊन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, महापौर सविता कांबळे, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, कर्नाटक सरकारचे दिल्लीतील द्वितीय प्रतिनिधी प्रकाश हुकेरी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, खासदार पी. सी. गंदीगौडर, खासदार राजा अमरेश्वर नायक, आमदार अभय पाटील, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, उपमहापौर आनंद चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) बेंगलोरचे आरओ व्ही बी ब्रह्मणकर यांनी स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेळगाव शहरांमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात येणाऱ्या सुमारे 7300 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत आहे. केंद्रीय वाहतूक सचिवालयाकडून येत्या दोन-तीन वर्षात आर्थिक विकासासाठी राज्यातील रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. त्याद्वारे नवे उद्योगधंदे सुरू व्हावेत, नव्या योजना अंमलात याव्यात हा केंद्र व राज्य सरकारचा उद्देश आहे. तो उद्देश सफल करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात आले आहे. त्यांच्या मंत्री पदाच्या कालावधीत अनेक रस्त्यांचा प्रशस्त सुंदर कायापालट झाला असून याबाबतीत त्यांनी इतिहास निर्माण केला आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास करणारे ते बहुदा पहिलेच केंद्रीय मंत्री असावेत. यापुढेही अशा पद्धतीने रस्त्यांच्या विकासाच्या माध्यमातून ते राज्य व राष्ट्राचाही विकास साधतील यात शंका नाही. बेळगावसह कर्नाटकातील रस्त्यांच्या सुधारणे संदर्भात त्यांनी नऊ वेळा नवी दिल्ली, गोवा, बेंगलोर वगैरे ठिकाणी बैठका घेतल्या हे विशेष होय. राज्यातील विकासाची गरज असलेल्या रस्त्यांची यादी आम्ही त्यांच्याकडे दिली आहे. त्यांनी देखील येत्या मार्च अखेरपर्यंत याबाबतीत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कोणताही भेदभाव न करता पक्षीय राजकारण बाजूला सारून आवश्यक विकास कामांना प्राधान्य देतात हे अभिमानास्पद आहे. केंद्रात एक सरकार आणि राज्यात दुसरे सरकार असेल तर अन्याय भेदभाव होण्याची शक्यता असते मात्र मंत्री गडकरी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय वाहतूक सचिवालयाच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही. देशातील रस्त्यांच्या विकासासाठी नितीन गडकरी यांनी केलेले कार्य पाहता त्यांना ‘रस्ते महाराज’, ‘सडके बादशहा’च म्हंटले पाहिजे. माझं खातं देखील सध्या उत्तम कार्य करत आहे. मी देखील सीआरएफच्या निधीचे कोणताही भेदभाव न करता सर्व आमदारांमध्ये समान वाटप केले आहे. गेल्या वीस वर्षाच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडत आहे. आमच्यासाठी निधी कोणत्या पक्षाला दिला यापेक्षा जनतेची गैरसोय दूर करणाऱ्या रस्त्यांचा विकास होणे महत्त्वाचे आहे. रस्ते मजबूत व प्रशस्त असले की विकासासाठी आवश्यक दळणवळण देखील उत्तम होते. बेळगावच्या एलिव्हेटेड कॉरिडोर संदर्भात केंद्रीय मंत्री गडकरी यांना मी बऱ्याचदा विनंती केली होती. सदर कॉरिडॉर झाल्यास बेळगाव शहरातील वाहतुकीची समस्या निकालात निघेल हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. गोकाक फॉल्स येथे पर्यटन उद्योग सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांची एक योजना आहे. ती देखील मंत्री गडकरी यांच्या नजरेस आणून दिली आहे. चांगल्या रस्त्यांद्वारे राज्याचा आणि देशाचा अधिकाधिक विकास व्हावा ही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आमचे राज्य सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.Nitin gadkari

पालकमंत्र्यांच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून 400 किमी अंतराच्या आणि सुमारे 7300 कोटी रुपये खर्चाच्या अठराव्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा भूमिपूजन व कोनशिला समारंभ टाळ्यांच्या कडकडाटात पार पडला. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यशस्वीरित्या राबवलेल्या देशातील विविध रस्ते विकास प्रकल्पांचा व्हिडिओ सादर करण्यात आला.

यावेळी बोलताना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून मी मंत्री झाल्यापासून बेळगाव रिंग रोडची समस्या अनेक लोकांनी बऱ्याच वेळा माझ्यासमोर मांडली. आज खासदार दिवंगत सुरेश अंगडी आपल्यात नाहीत, मात्र ते देखील या संदर्भात माझ्याकडे अनेकदा आले होते. मला आज आनंद होतोय त्या कामाची आज सुरुवात होत असून हे बेळगावसाठी मोठे यश आहे. त्यासाठी बेळगावच्या जनतेचे मी अभिनंदन करतो. जेव्हा 2014 मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये आमचे सरकार आले त्यावेळी कर्नाटकमध्ये फक्त 6707 कि.मी. अंतराच्या लांबीचा महामार्ग होता आता 2024 मध्ये ही लांबी जवळपास 8200 की.मी. इतकी झाली आहे. कर्नाटकमध्ये गेल्या दहा वर्षात आम्ही कमीत कमी 3 लाख कोटी रुपयांची विकास कामे करण्याचा संकल्प आम्ही केला होता. मला सांगायला आनंद होतोय की आतापर्यंत 65 हजार कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 80 लाख ते 1 कोटी रुपये खर्चाची विकास कामे सुरू आहेत. याखेरीज 1.5 लाख कोटींची प्रलंबित विकास कामे आहेत. त्यांची घोषणा मी आज करणार आहे. कर्नाटक हे प्रगतशील समृद्ध आणि संपन्न राज्य आहे मात्र रस्त्याशिवाय पर्यटन येऊ शकत नाही उद्योगधंदे येऊ शकत नाही ना रोजगार उपलब्ध होऊ शकतो यासाठी आमच्या विकास कामांचा उपयोग कर्नाटकला मोठ्या प्रमाणात होईल आज बेळगावमध्ये 6900 कोटी रुपये खर्चाच्या 15 प्रकल्पांचा भूमिपूजन समारंभ होत आहे. तसेच 300 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पणही होत आहे. बेळगावच्या बायपास रस्त्याची लांबी तीन पॅकेज मध्ये 69 कि.मी. इतकी असून या रस्त्यासाठी 3400 कोटी रुपये आहे. या रस्त्यामुळे बेळगावहून गोव्याला जाण्यासाठी जो 3 तासाचा प्रवास कालावधी लागत होता तो निश्चितपणे आता अवघा 1.45 तास इतका कमी होईल. हा रस्ता बेळगाव विमानतळासाठी देखील उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण करेल आणि विमानतळापासून सुवर्ण विधानसौधपर्यंत कमी वेळेत पोहोचता येईल. बेळगाव शहरा नजीकच्या हत्तरगी कणकला येथील विशेष आर्थिक क्षेत्राला या रस्त्याचा चांगला लाभ होईल. आज 1600 कोटी रुपये खर्चाच्या 34 कि.मी. अंतराच्या रस्ते प्रकल्पाचेही भूमिपूजन होत आहे. तसेच उर्वरित दोन पॅकेजचा डीपीआर जवळपास पूर्ण झाला आहे. दुसरा एक महत्त्वाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर एनएच 748 ए जो बेळगावहून रायचूर पर्यंत आहे. हा रस्ता एकूण 7 पॅकेजेसमध्ये तयार केला जाईल. या रस्त्याची लांबी 317 कि.मी. इतकी असून याची किंमत 9000 कोटी रुपयांपर्यंत असेल. या रस्त्यामुळे प्रवासाचा 8 तासाचा कालावधी कमी होऊन केवळ 3.5 तास इतका होईल. ही परियोजना दोन प्रमुख एक्सप्रेस हायवे, पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे आणि सुरत चेन्नई एक्सप्रेस वे यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ज्यामुळे कर्नाटकच्या उत्तर भागाचा आर्थिक विकास होईल. तुमकुर बायपासची देखील बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे. सदर 44 किमी अंतराच्या रस्त्यासाठी 2600 कोटी खर्च येणार आहे भारतातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रियल पार्क पैकी एक असलेल्या वसंता नरसापुरा औद्योगिक वसाहतीशी शिमोगा, होन्नावर, कारवार यांची उत्तम कनेक्टिव्हिटी राहील. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा जो प्रकल्प आहे त्याला देखील चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तुमकुर, शिमोगा व चिकमंगळूर येथील पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्यामधील गैरसोय दूर होईल.

महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 चा भाग असलेल्या बेळगाव ते संकेश्वर रस्त्याचे 6 पदरीकरण करण्यात येत आहे. याच्या दोन पॅकेजेसची लांबी 78 कि.मी. आहे आणि ज्याची किंमत 3000 कोटी रुपये इतकी आहे. या रस्ते कामाच्या दुसऱ्या टप्प्यात वनखात्याची परवानगी आणि झाडे तोडण्याची परवानगी अद्याप प्रलंबित आहे. तरी कृपया कर्नाटकचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याप्रकरणी लक्ष घालावे. कारण त्यामुळे या भागातील कामे थांबली आहेत. संबंधित परवानगी मिळाल्यास 7 कि.मी. अंतराचे थांबलेले विकास काम पूर्ण होईल. ज्यामुळे थेट मुंबईहून बेंगलोरपर्यंत जी कनेक्टिव्हिटी आहे तिचे जवळपास गोव्यापर्यंतचे काम पूर्ण होईल. हा महामार्ग तिरुवनंतपुरम कोचीनपर्यंत जाणार आहे. ही कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे आणि गोवा व बेळगाव मध्येही तिचा खूप फायदा होईल. या रस्त्याचे काम पूर्ण होतात बेळगाव ते संकेश्वर प्रवासासाठी जो सध्या 2.5 ते 3 तासाचा कालावधी लागतो तो कमी होऊन 1.15 इतका होईल. औराद ते बिदर पर्यंतचा रस्ता एनएच 161 ज्याची लांबी 46 कि.मी. असून 303 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचा विकास केला जाणार आहे. मार्च 2024 मध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होईल आणि प्रवासाचा कालावधी दोन तासावरून एक तास इतका होईल आम्ही इकॉनोमिक कॉरिडॉर बनवत असून जे 10,000 कि.मी अंतराचे आहेत. ज्यांच्यावर आम्ही 6 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. सध्याच्या 27 एक्सप्रेस वे पैकी 3 एक्सप्रेस वेंची लांबी सुमारे 500 कि.मी. इतकी असणारा असून कर्नाटकातून जाणाऱ्या या एक्सप्रेस वेंसाठी 30 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचा बेंगलोर ते चेन्नई हा महामार्ग जो 18000 कोटी रुपये किमतीचा आणि 265 किमी अंतराचा आहे. या महामार्गाचे 53 टक्के काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाचा 71 कि.मी. अंतराचा भाग कर्नाटकात असून त्याचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर महामार्गामुळे अवघ्या 2 तासात बेंगलोर होऊन चेन्नईला पोहोचता येणार आहे. येत्या डिसेंबर पूर्वी या महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल. बेंगलोरच्या रिंग रोडची समस्या मोठी आहे. अनेक वर्ष प्रलंबित असलेला हा खूप मोठा प्रकल्प आहे. आतापर्यंत प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर बेंगलोर रिंग रोडचा प्रस्ताव मांडला आहे. बेंगलोरची जनता देखील वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाली आहे. त्यामुळे आता आम्ही 282 की.मी. अंतराच्या बेंगलोर रिंग रोडच्या कामाला मंजुरी दिली आहे. सदर प्रकल्पासाठी 17000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पाचे 34 टक्के काम पूर्ण झाले आहे. या रिंग रोडचा 242 कि.मी. भाग कर्नाटकात, तर उर्वरित तामिळनाडू मध्ये आहे. बेंगलोरचा हा रिंग रोड राज्यातील सर्व ठिकाणांहून येणाऱ्या लोकांसाठी लाईफ लाईन बनेल आणि बेंगलोरमधील वाहतूक कोंडी समाप्त होईल सोलापूर कर्नुल चेन्नई हा 337 किमी अंतराचा महामार्ग 11000 कोटी रुपयांतून तयार केला जात आहे. याचे 32 टक्के काम पूर्ण झाले असून कर्नाटकातील 40 टक्के काम पूर्ण झाले आहे असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अन्य प्रकल्पांची माहिती दिली.

यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आणि खासदार मंगल अंगडी यांनीही समायोजित विचार व्यक्त केले. समारंभास आजी-माजी लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.