बेळगाव लाईव्ह : राज्यातील काँग्रेस सरकारने लागू केलेल्या विविध हमी योजनांसाठी रेशन कार्ड गरजेचे आहे. अद्याप काही नागरिकांची रेशन कार्ड संदर्भातील कामे अर्धवट स्थितीत आहेत.
काहींनी नव्या रेशनकार्डसाठी अर्ज केले आहेत तर काहींनी जुन्या रेशन कार्डमध्ये दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत. मात्र शासनाकडून रेशनकार्डची कामे ठप्प करण्यात आली असल्याने लाभार्थ्यांची धडपड पहावयास मिळत आहेच शिवाय अनेकांना शासकीय सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. रेशन कार्ड संदर्भातील कामे बंद असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. अधूनमधून रेशनकार्डच्या नावातील बदलासाठी सर्व्हर दिले जात आहे. मात्र केवळ मोजक्या वेळेसाठीच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना रेशनकार्डपासून वंचित रहावे लागत आहे.
मागील दोन वर्षांपासून रेशनकार्डचे काम प्रलंबित पडले आहे. मध्यंतरीचा काही काळ वगळता नवीन रेशनकार्डचे काम ठप्प आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी रेशनकार्डमध्ये महिला प्रमुख असणे आवश्यक आहे. यासाठी अनेकांची नावात बदल करून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. रेशनकार्डच्या दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू असली तरी शासनाकडून सर्व्हरची सेवा बंद आहे.
त्यामुळे मागील सहा महिन्यांच्या गृहलक्ष्मीपासून वंचित लाभार्थ्यांकडून खंत व्यक्त होत आहे. रेशनकार्ड सर्व्हरची सेवा सुरळीत नसल्याने अनेकांची रेशनकार्डची कामे प्रलंबित आहेत. विशेषत: या लाभार्थ्यांना गॅरंटी योजनांबरोबर इतर सरकारी सुविधांपासूनही दूर रहावे लागत आहे. बुधवारी ग्रामवन कार्यालयात सर्व्हरची सेवा उपलब्ध केल्याची चर्चा होती. त्यामुळे लाभार्थ्यांनी ग्रामवन आणि ऑनलाईन केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र दिवसभर सर्व्हरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा लाभार्थ्यांना निराशेने माघारी परतावे लागले.
रेशनकार्डच्या कामकाजासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी, राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर नवीन रेशनकार्डाच्या कामाला चालना दिली जाणार असल्याचे सांगितले. गतवर्षी केलेले अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. आदेश आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अर्जांनाच प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.
टप्प्याटप्प्यात नवीन रेशनकार्ड आणि दुरुस्तीची कामेही सुरू होणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनीयप्पा यांनी नवीन रेशनकार्डाच्या कामाला प्रारंभ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे सरकारलाच रेशनकार्ड द्यायचे नसल्याच्या भावना लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.
मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डची अर्ज प्रक्रियाही ठप्प झाली आहे. अर्ज स्वीकृती प्रक्रिया आज, उद्या सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज करणाऱ्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच उरली आहे.