बेळगाव लाईव्ह: बेळगाव आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या चोर्ला रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला आज सुरुवात झाली. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते कणकुंबी येथे करण्यात आला.
मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगावला भेट दिली. यादरम्यान बेळगाव ते गोवा मार्ग जोडण्याबाबचे महत्व अधोरेखित केले होते. या अनुषंगाने या मार्गाचे कामकाज जलदगतीने हाती घेण्यात आले आहे.
रस्तेकामाचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात तक्रारी पुढे येत होत्या. गेल्या वर्षभरात नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी निवेदने दिली. प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकल्या.
या रस्त्याची स्थिती स्वतः मी पाहिली आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीसाठी मागणी केली. या मागणीला अनुसरून रस्ते दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असून लवकरात लवकर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. रणकुंडये क्रॉस ते गोवा सीमेपर्यंतच्या भागाला अधिक प्राधान्य देत गुणवत्तेचे निर्दोष मानक राखून जलद दुरुस्ती करण्याचे कंत्राटदारांना सुचविले असल्याचे जारकीहोळी म्हणाले.
यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सतीश जारकीहोळी आणि नितीन गडकरी यांचे आभार मानले. मागील वर्षी पावसाळ्यात हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. यामुळे स्थानिक नागरिकांसह गोव्याहून बेळगावला येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या गोष्टीची दखल घेऊन अखेर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आपल्याला आनंद झाल्याचे ते म्हणाले.
४३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५८ कोटी ९० लाख रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून चोर्ला मार्ग हा बेळगाव ते गोवा प्रवासादरम्यानचा प्राथमिक मार्ग आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ होत असते. बेळगावची बाजारपेठ मोठी असल्याने महाराष्ट्रातील सीमेलगत असणारी गावे आणि गोव्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात बेळगावमध्ये दाखल होतात. गोवा मार्गे येणारे नागरिक अनमोड आणि चोर्ला मार्गाला अधिक प्राधान्य देतात. सध्या अनमोड मार्गाचीही दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे गोव्यातील नागरिकांना चोर्लामार्गे बेळगाव गाठावे लागत आहे. अलीकडच्या काळात हा रास्ता मोठ्या प्रमाणात खचला होता. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पुढे येत होती. या मागणीला अनुसरून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकारातून रस्त्याच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. यामुळे स्थानिक नागरिक आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, शहर उत्तरचे आमदार असिफ सेठ, वि. प. सदस्य नागराज यादव, कणकुंबी ग्रामपंचायत अध्यक्षा दीप्ती गवस, राष्ट्रीय महामार्गाचे चीफ इंजिनियर, ग्राम पंचायतीचे सदस्य, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.