बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगावकरांचे आणि बेळगाव शहराचे वाभाडे काढणाऱ्या विकासाची नोंद विक्रम नोंद करणाऱ्या गिनीज बुक, लिम्का बुक यासारख्या नामांकित पुस्तकांमध्ये केली तर नवल वाटू नये! स्मार्ट सिटीच्या कामामुळे आणि या कामामुळे होत असलेल्या गैरसोयींमुळे बेळगावकर नागरिकांच्या डोकेदुखीत तर भर पडलीच आहे.
शिवाय विकासाच्या नावाखाली शहराला भकास करण्यात आले आहे. याचा प्रत्यय आजवर अनेकवेळा आला आहे. बेळगाव स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या भव्य रेल्वेस्थानकासमोर पुन्हा एकदा अशाच गोष्टीचा प्रत्यय आला असून रेल्वेस्थानकासमोरील स्मार्ट बसस्थानक विविध समस्यांच्या गर्तेत गुरफटले आहे.
मध्यवर्ती रेल्वे स्थानकासमोरील स्मार्ट सिटी बस स्थानकाची स्थिती पाहिल्यास स्मार्ट सिटी मध्ये राहिल्याचे दुर्दैव वाटते. आधुनिक पायाभूत सुविधांपैकी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या बहुतेक स्मार्ट बसस्थानकाची सध्या सर्वत्रच अशी दुरवस्था पाहायला मिळते. तुटलेल्या, मोडकळीस आलेल्या अवस्थेतील आसने, चोहोबाजूंनी पसरलेला कचरा, जनावरांचे, भिक्षुकांचे, मद्यपींचे आसरा मिळविण्याचे स्थान बनलेले बसस्थानक बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीचे कधीच ठरत नसल्याचे चित्र आहे.
मध्यवर्ती रेल्वेस्थानकासमोर असलेल्या स्मार्ट सिटी बसस्थानकाची अवस्था पाहिल्यास एखाद्या कचरा कुंड्याप्रमाणे हा परिसर वाटतो. बेळगाव शहरात परगावाहून, परराज्यातून रेल्वेतून प्रवास करून येणारे नागरिक याच ठिकाणी सर्वप्रथम प्रवेश घेतात. मात्र शहरात प्रवेश घेताना अशापद्धतीने त्यांचे स्वागत आपण करत आहोत, याचा खेद प्रत्येक बेळगावकरांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि येथील प्रशासनाला वाटला पाहिजे.
गाजावाजा करून, थाटामाटात, प्रतीक्षा करून, आंदोलने करून आणि मुख्य म्हणजे अनेक वादावादीनंतर मध्यवर्ती रेल्वेस्थाकाचे उद्घाटन करण्यात आले. महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या सेवेच्या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी उपक्रमाने पुढाकार घेतला, हि चांगली बाब आहे. मात्र नव्याची नवलाई संपते त्याप्रमाणे येथील देखभालीकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. येथील देखभालीची जबाबदारी कॅंटोन्मेंट बोर्डाकडे येते. मात्र शहरातील इतर कॅंटोन्मेंट हद्दीतील अव्यवस्थेप्रमाणेच या भागातील अव्यवस्थेकडेही कॅंटोन्मेंट बोर्डाने डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.
रेल्वेस्थानकासमोरील भागात बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौकी, महिलांसाठी उभारण्यात आलेले वेटिंग रम, बसस्थानकाच्या आवारातील दुकाने यासारख्या संसाधनांच्या वापरावर प्रश्नचिन्ह उभारण्यात येत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून संसाधने उपलब्ध करून देण्यात आली, मात्र याकडे देखभालीसाठीही लक्ष देणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांच्या विकासातील हादेखील महत्वपूर्ण पैलू आहे. केवळ संसाधने पुरविणे महत्वाचे नसून त्यांची योग्य देखभाल घेणेही महत्वाचे आहे.
प्रशासन, कार्यरत असणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याप्रमाणेच जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून या सर्व गोष्टी जोपासण्याची जबाबदारी देखील प्रत्येक बेळगावकरांची आहे. प्रशासनाकडून आपल्या सोयीसाठी अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात.
मात्र अशा संसाधनांचा योग्य वापर करणे, सुजाण आणि जबाबदार नागरिकांची कर्तव्ये पार पाडणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, ऱ्हास होणार नाही याची खबरदारी बाळगणे या सारख्या प्रत्येक गोष्टी नागरिकांनीही आत्मसात करणे गरजेचे आहे. प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या नावाखाली भलेही तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, परंतु ‘पदरी पडले पवित्र झाले’! म्हणून प्रत्येकानेच जबाबदारीने, जागरूकतेने आपली कर्तव्य बजावणे गरजेचे आहे.