बेळगाव लाईव्ह :मुघल साम्राज्याविरुद्धचे युद्ध, ऐतिहासिक तथ्यावर आधारित देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘छत्रपती संभाजी’ या बहुचर्चित भव्य मराठी चित्रपटाचे आज शहरात दणक्यात स्वागत करण्यात आले. सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
बहुचर्तीत छत्रपती संभाजी हा भव्य चित्रपट शहरातील निर्मल आणि कपिल या चित्रपटगृहांमध्ये आज शनिवारपासून प्रदर्शित झाला आहे. निर्मल चित्रपटगृहामध्ये आज सकाळी या चित्रपटाच्या प्रीमियर शोची जय्यत तयारी करण्यात आली होती. या शोसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, साहित्यिक गुणवंत पाटील, विकास कलघटगी, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, सतीश पाटील,सागर पाटील, सुनील जाधव प्रशांत पाटील आदी सह अन्य मान्यवर तसेच श्रीराम सेना आणि समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
या सर्वांचे मराठमोळ्या पद्धतीने तुतारी वाजवून ताशांच्या दणदणाटात स्वागत करण्यात आले. प्रारंभी रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाच्या भव्य पोस्टरचे फीत कापून आणि श्रीफळ वाढवून फटाक्यांच्या आतषबाजीत चित्रपटगृहावर अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय असा जयजयकार करण्यात आला.
पोस्टरचे अनावरण केल्यानंतर बोलताना रमाकांत कोंडुसकर यांनी छत्रपती संभाजी हा चित्रपट आपल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करून समस्त शंभू भक्त शिवभक्तांना शिवकालीन इतिहास दाखवण्याचं कार्य केल्याबद्दल सर्वप्रथम निर्मल चित्रपटगृहाचे चालक महेश कुगजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले. धर्मासाठी जगावं कसं आणि धर्मासाठी मराव कसं हे शिकवून गेलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आज आपल्याला या चित्रपटातून पहावयास मिळतो असे सांगून समस्त शंभू व शिवभक्तांसह आबालवृद्ध, विद्यार्थी -विद्यार्थिनींनी हा चित्रपट पहावा, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले. माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी समायोचित विचार व्यक्त करताना छ. संभाजी महाराजांनी अगणित अत्याचार सहन करून धर्मासाठी दिलेल्या आपल्या बलिदानाची माहिती दिली.
ते बलिदान मराठी माणूस हिंदू माणूस विसरू शकणार नाही असे सांगून हिंदू बांधवांमधील मरगळ दूर व्हावी यासाठी हा चित्रपट आहे असे स्पष्ट केले. छत्रपती संभाजी चित्रपटाच्या प्रीमियर शोला महिलावर्गाची उपस्थिती देखील लक्षणीय होती.