बेळगाव लाईव्ह:वायव्य कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाकडून (एनडब्ल्यूकेआरटीसी) प्रवाशांच्या सेवेसाठी 50 नव्या कोऱ्या बीएस 5 अशोक लेलँड बसगाड्या बेळगाव विभागामध्ये रुजू करण्यात आल्या आहेत.
सदर नव्या बसेस पूर्वीच्या बस गाड्यांपेक्षा अधिक पर्यावरण पूरक असून अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या या नव्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक वाहन स्थिरता नियंत्रण प्रणाली आणि ऑनबोर्ड डायग्नोस्टिक सिस्टम आहे.
या नव्या बसेस दाखल होणे म्हणजे बेळगावच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सकारात्मक विकास म्हणावा लागेल. प्रवाशांना या नव्या बस गाड्या अधिक आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव तर देतीलच शिवाय त्यांच्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
बेळगाव परिवहन विभागात दाखल झालेल्या नव्या कोऱ्या 50 बसेसचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत. एका नेटकऱ्याने सदर प्रकार म्हणजे निवडणुकीची हवा सुरू झाली असे म्हंटले आहे. नव्या बसेस रुजू झाल्या परंतु देखभालीच्या गुणवत्तेचे काय? असा सवाल एकाने केला आहे बेंगलोरमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि सर्व सुविधांनी युक्त (लक्झरी) बसेस वापरल्या जात आहेत.
परंतु बेळगावमध्ये मात्र अद्याप जुन्या मॉडेलच्या बस कार्यरत आहेत असा भेदभाव का? असा प्रश्न एकाने केला आहे, तर अन्य एकाने बेळगावकरांना नव्या बसेसची सवय नाही. खरंतर गेल्या दोन दशकात त्यांनी नव्या बसेस पाहिलेल्याच नाहीत, असे म्हंटले आहे. या पद्धतीने असंख्य प्रतिक्रिया नव्या बसेससंदर्भात सोशल मीडियावर उमटत आहेत.