बेळगाव लाईव्ह : सदाशिव नगर स्मशानभूमीत गेल्या अडीच महिन्यांपूर्वी शेडची व्यवस्था करण्यासंदर्भात नगरसेवक शंकर पाटील यांनी एक व्हिडीओ प्रकाशित केला होता.
या व्हिडिओची दखल महापौर आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी घेत तात्काळ कामकाजाला सुरुवात केली होती. मात्र हे काम पुन्हा अर्धवट स्थितीत असल्याचे निदर्शनात आले आहे.याच कामा बाबत नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी अनेकदा मनपा आयुक्तां याबाबतची कल्पना दिली होती मात्र पुन्हा याकडे दुर्लक्ष झाले आहे.
अंत्यविधीसाठी जाणाऱ्या नागरिकांना उन्हातच ताटकळत थांबावे लागत असल्याने काही समाजसेवक आणि नागरिकांनी सदाशिवनगरमध्ये शेडची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. याठिकाणी असलेला शेडवरील पत्रे खराब झाल्याने शेडची दुरवस्था झाली होती.
मात्र नगरसेवक, समाजसेवक आणि नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीची दखल घेत याठिकाणी पत्रे बसविण्याचे काम सुरु करण्यात आले. दरम्यान पुन्हा हे कामकाज थंडावल्याचे दिसून येत असून तातडीने याठिकाणी शेडवरील पत्रे बसविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जाणकार नागरिकांनी यासंदर्भात महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या.
यादरम्यान येत्या १५ ते २० दिवसात हे कामकाज करण्यात येईल, अशी ग्वाही दिली होती. मात्र हे कामकाज अर्धवट स्थितीतच राहिल्याने पुन्हा नागरिकांना उन्हाच्या झळा सोसत अंत्यविधीसाठी उभं राहण्याची वेळ येत आहे. याची दखल घेत तातडीने शेडवरील पत्रे बसविण्यात यावेत, अशी मागणी पुढे येत आहे.