Saturday, December 21, 2024

/

हलशी बसस्थानकाची भग्नावस्था!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या कित्येक वर्षांपासून खानापूर तालुक्यातील हलशी गावातील बसस्थानक भग्नावस्थेत असून खानापूर युवा समिती व ग्राम पंचायत सदस्यांनी या बसस्थानकासाठी निधी मंजूर करून नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत हलशी बस स्थानक आहे. हलशी हे खानापूर तालुक्यातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. पांडवकालीन नरसिंह मंदिर या भागात असून दररोज शेकडो पर्यटक नरसिंह मंदिराला भेट देत असतात. आजूबाजूच्या वीस पंचवीस गावचा संपर्क हलशी गावाशी येतो.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तसेच नंदगड खानापूर व बेळगावला जाण्यासाठी येथील बसस्थानकाचा वापर शेकडो नागरिक व विद्यार्थी करत असतात. बस स्थानकाची इमारत धोकादायक अवस्थेत असून प्रवाशांसाठी उभारलेल्या बस स्थानकात सध्या भटकी कुत्री व जनावरे आढळून येत आहेत. तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे तत्कालीन आमदार व्ही. वाय. चव्हाण व त्यावेळच्या मंत्र्याकडून या बस स्थानकाचे उद्घाटन झाले होते, त्यानंतर या बस स्थानकाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलेल आहे. बऱ्याचदा या बसस्थानकाचा प्रश्न सरकारी दरबारी मांडण्याचा प्रयत्न येथील कार्यकर्त्यांनी केलेला आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.Khanapur bus stand

या बसस्थानकाच्या दुरवस्थेची पाहणी आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समितीच्या वतीने करण्यात आली. यावेळी या भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेऊन या बस स्थानकाचा प्रश्न सोडवण्यासाठी इमारतीला मोठा निधी द्यावा व प्रवाशासाठी बाकीच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात असे मत मांडून सरकार दरबारी या बसस्थानकाचा आवाज उठविण्याचा निर्धार करण्यात आला.

यासंदर्भात खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील आणि स्थानिक नेते राजू पाटील, अर्जुन देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य संजीव हलगेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग बावकर, सामाजिक कार्यकर्ते निंगाप्पा होसुर, दिनेश गुरव, सुभाष गुरव, प्रल्हाद कदम, ग्रामपंचायत सदस्य मुल्ला यांच्यासमवेत बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने बसस्थाकाचे नूतनीकरण करण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.