बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांकडे इच्छुकांची रीघ लागण्यास सुरुवात झाली असून लोकसभा निवडणुकीत कोणते नेते आपले नशीब आजमावणार यासंदर्भातील चर्चांना ऊत आला आहे.
विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचेही नाव चर्चेत आले असता त्यांनी मात्र आपण लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्धार केल्याचे समजते.
आज केरूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आपल्या उमेवारीसंदर्भात स्पष्टीकरण दिले. आपण फुटबॉल प्रमाणे नाही त्यामुळे आपण आता लोकसभा निवडणूक लढविणार नाही. शिक्षकांच्या सेवेसाठी आपल्याला शिक्षकांनी विधान परिषद सदस्य म्हणून निवडून दिले आहे.
अद्याप माझ्याकडे पाच वर्षाचा कार्यकाळ आहे. या काळात आपण शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात काम करणार आहे. हायकमांडने कितीही दबाव आणला, मला लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जरी मिळाली तरी आपण निवडणूक लढवणार नाही.
आपण विधान परिषदेचे सदस्य आहोत आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणूनच काम सुरु ठेवणार असा खुलासा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला.