बेळगाव लाईव्ह : राज्यातील सर्व आस्थापने, व्यावसायिकांच्या नामफलकांवर ६० टक्के कन्नड मध्ये मजकूर असणे सक्तीचे करण्यात आल्यानंतर सीमाभागात कन्नड संघटनांची कोल्हेकुई वाढली आहे. बेळगावमधील मराठी भाषिकांच्या आस्थापनांना, नामफलकांना लक्ष्य करत कन्नड संघटनांची वळवळ सुरु झाली आहे.
अनगोळ भागात असणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ फलकावरून आज करूनाडू विजयसेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. बहुल मराठी भाग असणाऱ्या सीमाभागात अधिकाधिक फलक हे मराठी भाषेत आहेत. शिवाय गोवा, महाराष्ट्रातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र सीमाभागात सर्वत्र दिसून येणाऱ्या मराठी भाषेतील नामफलकांमुळे कन्नड संघटनांना पोटशूळ उठला असून विधिमंडळात विधेयक संमत झाल्याचा फायदा घेत जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना डिवचण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडविण्याचा विडा कन्नड संघटना आणि त्यांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी उचलला आहे. विधेयक संमत झाल्यानंतर या संघटना अधिकच आक्रमक होऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
करुनाडू विजयसेना नामक संघटनेने अनगोळमधील ‘जय महाराष्ट्र’ चौकाचा बोर्ड हटवण्याच्या मागणीसाठी गुरुवारी महानगरपालिकेसमोर निदर्शने केली. घोषणाबाजी करून गोंधळ घालणाऱ्या या कार्यकर्त्यांनी मनपा प्रवेशद्वारातच ठाण मांडले.
यावेळी पालिका आयुक्त पी. लोकेश यांनी निदर्शकांची भेट घेऊन सरकारच्या निर्देशानुसार नामफलकांवर कन्नडला अधिक प्राधान्य देण्याची सूचना करणाऱ्या नोटीसा महापालिकेने सर्व व्यापारी-व्यावसायिकांना पाठविण्यात आल्या असून जाहीर निवेदनही केल्याचे सांगितले.
मूठभर कार्यकर्त्यांना जमा करून पालिकेसमोर निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कायद्याच्या आडून आपले इप्सित साध्य करण्याचा पवित्रा उचलल्याचे सदर प्रकारावरून दिसून आले.