बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराजवळील डोंगराळ भागातील सोनट्टी गावात बेळगाव पोलिसांनी धाडसी मोहीम राबवत हातभट्टीच्या गावठी दारूचा साठा जप्त केला असून या कार्रवाईअंतर्गत १२ लाख रुपये किमतीची सुमारे ५७०० लिटर दारू जप्त केली आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळण्याचा अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गावावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक पोलिसांची तीन ते चार पथके तयार करून हातभट्टीची दारू बनवणाऱ्या अड्ड्यांवर छापेमारी करण्यात आली.
यावेळी बॅरल आणि भांड्यात साठवून ठेवलेली आणि कच्ची गावठी अशी तब्बल ५७०० लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना बेळगाव शहर पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी सांगितले कि, बेळगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ५७०० लिटर दारू जप्त केली असून काही घरांवरही छापे टाकून तस्करीचा माल जप्त करण्यात आला. याबाबतची माहिती आठवडाभरापूर्वी आपल्याकडे आली होती.
सदर माहितीची खातरजमा करून आज हि कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी करण्यात येणार आहे. कारवाई करण्यासाठी धाड टाकताच येथील सर्वजण पळून गेले.
मात्र एक आरोपी हाती लागला असून सदर आरोपीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी बऱ्याच दिवसांपासून हा व्यवसाय सुरु असून लवकरच सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.