बेळगाव लाईव्ह:अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर राम भक्तांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या बेळगाव -अयोध्या -बेळगाव अशी एकच फेरी करणाऱ्या भारतीय रेल्वेच्या बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेने आज शनिवारी सकाळी अयोध्येच्या दिशेने प्रयाण केले.
बेळगाव रेल्वे स्थानकावर बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचा स्वागत आणि अयोध्येच्या दिशेने निरोप देण्याचा समारंभ आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी पूज्य स्वामीजींच्या हस्ते पूजन करण्याबरोबरच हिरवा बावटा दाखवून रेल्वेसह श्री राम लल्लाच्या दर्शनास जाणाऱ्या प्रवाशांना निरोप देण्यात आला.
याप्रसंगी शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेने आज शनिवारी सकाळी 10:35 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावरून प्रस्थान केले असून ती अयोध्या येथे सोमवारी सकाळी 10:35 वाजता पोहोचणार आहे.
त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात सदर रेल्वे मंगळवारी 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:55 वाजता आयोध्या रेल्वे स्थानकावरून प्रस्थान करेल आणि गुरुवारी 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4:45 वाजता या रेल्वेचे बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल.
रेल्वे खात्याने या पद्धतीने बेळगाव ते अयोध्या विशेष रेल्वेचे नियोजन केल्याबद्दल राम भक्तांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे सोशल मीडियावर अयोध्येला जाऊ इच्छिणारे बहुसंख्य उत्साही राम भक्त अयोध्येसाठी पुढची रेल्वे केंव्हा आहे? अशी विचारणा करू लागले आहेत. दुसरीकडे कांहीजण अशा विशेष रेल्वेमुळे रेल्वेचे नेहमीचे वेळापत्रक कोलमडते असा तक्रारीचा सूर लावताना दिसत आहेत.